Pune: पोलीस भरती मैदानी चाचणीत तरुणाचा मृत्यू

पुणे – पुणे पोलिसांच्या भरती प्रक्रियेतील मैदानी चाचणीत धावणाऱ्या तुषार भालके या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शिवाजीनगर कवायत मैदानावर शनिवारी सकाळी घडली. भालके याच्या मृत्युमागचे कारण समजले नाही. मैदानावर धावताना तो सकाळी आठच्या सुमारास चक्कर येऊन पडला. शवविच्छेदनानंतर मृत्युमागचे निश्चित कारण समजेल, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांन दिली.
तुषार बबन भालके (वय २७) मूळचा नगर जिल्ह्यातील संगमनेरजवळील कोठे बुद्रुक गावचा आहे. शेतकरी कुटुंबातील तुषार मागील काही महिन्यांपासून पोलीस भरतीची तयारी करत होता. पुणे पोलिसांच्या भरती प्रक्रियेत तो सहभागी झाला होता. शनिवारी (६ जून) शिवाजीनगर पोलीस मुख्यालयातील कवायत मैदानावर मैदानी चाचणी सुरू आहे. भरती प्रक्रियेत सहभागी झालेले ८०० ते ८५० उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी बोलाविण्यात आले होते.
भरती प्रक्रियेत सहभागी झालेल्या उमेदवारांना क्रमांक (चेस्ट नंबर) देण्यात आले आहे. शनिवारी सकाळी आठच्या सुमारास मैदानी चाचणी सुरू झाली. मैदानी चाचणीसाठी धावण्यासाठी १६०० मीटरचे अंतर देण्यात आले होते. तुषारने धावण्यास सुरुवात केली. काही वेळात तो मैदानात चक्कर येऊन पडला. पोलिसांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी दिली.
तुषारच्या मागे आई-वडील, बहीण असा परिवार आहे. त्याच्या कुटुंबीयांना याबाबतची माहिती कळविण्यात आली आहे. ससून रुग्णालयात त्याचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांच्या ताब्यात मृतदेह देण्यात येणार आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्युमागचे निश्चित कारण समजेल, असे पोलीस उपायुक्त पवार यांनी नमूद केले.





