पुणे | मस्करीतील वादातून तरुणाचा मृत्यू

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – चेष्टा मस्करीतून झालेल्या वादात एका तरुणावर रविवारी कोयत्याने वार करण्यात आले होते. गंभीर जखमी झाल्याने संबंधित तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, सोमवारी त्याचा मृत्यू झाला. जयदीप ज्ञानेश्वर भोंडेकर (२२, रा. गुजर कॉम्प्लेक्स, मासे आळी, उत्तमनगर) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
याप्रकरणी, उत्तमनगर पोलिसांनी अमित सुदाम गुजर (२१, रा. मासे आळी उत्तमनगर) याला अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध सुरुवातीला खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, आता खुनाचे कलम वाढविण्यात आले आहे.
याप्रकरणी जयदीप याची आई लक्ष्मी ज्ञानेश्वर भोंडेकर (४२, रा. मासे आळी उत्तमनगर) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना दुपारी साडे बाराच्या सुमारास उत्तमनगरातील जुनी मासे आळी परिसरात घडली आहे.
दरम्यान, जयदीप याच्या नातेवाईकांनी उत्तमनगर पोलिसांत सोमवारी सायंकाळी गर्दी केली होती. त्यांनी जयदीप याचा मृतदेह रुग्णवाहिकेतून पोलीस ठाण्याच्या आवारात आणला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयदीप रविवारी दुपारी घरात झोपलेला होता. आरोपी अमित त्याच्या घरी आला, त्याने ‘दादा पोतं उचलायला जायचे आहे. माझ्या सोबत चल,’ असे म्हणत जयदीपला घराबाहेर घेऊन गेला. त्यानंतर १५ ते २० मिनिटांनी भोंडेकर यांच्या घराबाहेर नागरिकांच्या ओरडण्याचा आवाज आला. जयदीपच्या डोक्यात अमितने कोयता मारला आहे, असे म्हणत होते.
हा प्रकार समजताच लक्ष्मी भोंडेकर या जयदीपचे मित्रांसोबत जुनी मासे आळीतील घराजवळ गेले. तेथे जयदीप हा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याच्या डोक्यात कोयता अडकला होता. त्या वेळी जयदीपने अमित गुजर याने डोक्यात कोयता मारल्याचे त्याच्या आईला सांगितले.
त्यानंतर जयदीपवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना, सोमवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. चेष्टा मस्करीतून झालेल्या वादातून अमित याने जयदीपच्या डोक्यात कोयता मारल्याचे पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी सांगितले.





