Satara News : कोरेगावातील युवकाचा सर्पदंशाने मृत्यू

कोरेगाव : येथील जुना अकरा- आरफळ कॉलनी परिसरात असलेल्या मेंगडे नावाच्या शिवारात एका युवकाचा सर्पदंशाने शनिवारी दुपारी मृत्यू झाला. वेदांत हेमंत भोसले (वय 18 रा. आरफळ कॉलनी) असे त्याचे नाव आहे. जनावरांना चारा आणण्यासाठी वेदांत हा शेतात गेला होता, त्यावेळी ही दुर्दैवी घटना घडली. वेदांत याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, आजी आजोबा असा परिवार आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, शनिवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास वेदांत भोसले हा आरफळ कॉलनी परिसरात शेतात जनावरांना चारा आणण्यासाठी गेला होता. मात्र तो चारा घेऊन घरी परत आला नसल्याचे पाहून आईने त्याच्या मोबाईलवर फोन केला. परंतु, फोन उचलला गेला नसल्याने कुटुंबातील लोक भयभीत झाले.
त्याला पाहण्यासाठी शेतात गेले असता त्यांना वेदांत जमिनीवर पडला असल्याचे आढळून आले. त्यांनी तात्काळ उपचारासाठी वेदांतला शहरातील खाजगी रुग्णालयात नेले असता त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर उपजिल्हा रुग्णालयात त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. वेदांत भोसले हा इयत्ता बारावीत होता. रहिमतपूर येथील एका महाविद्यालयात तो शिक्षण घेत होता.
वेदांत भोसले हा लहानपणापासूनच कष्टाळू होता. शिक्षण घेत तो शेती व्यवसाय पाहत होता. स्वभावाने अत्यंत मनमिळावू असलेल्या वेदांत भोसले याचा कोरेगाव शहरासह रहिमतपूर परिसरात मोठा मित्र परिवार होता. रात्री उशिरा त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कोरेगाव पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून हवालदार अमोल कर्णे तपास करत आहेत.





