Pune | सोसायटीतील पाण्याच्या टाकीत आढळला तरुणाचा मृतदेह

पुणे : सिंहगड रस्ता भागातील नऱ्हे परिसरात सोसायटीच्या टाकीत पडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली.
विठ्ठल अंकुश वायकुळे (वय ३०, रा. पार्थवी सोसायटी, नऱ्हे) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. वायकुळे अविवाहित आहे.
तो मूळचा लातूरचा असून वारजे भागातील एका औषध निर्माण कंपनीत तो कामाला होता. पार्थवी सोसायटीतील सदनिकेत तो दोन मित्रांबरोबर राहत होता.
वायकुळे सोसायटीतील पाण्याचा टाकीत पडल्याची घटना रविवारी (३० मे) उघडकीस आली. त्याच्या मित्राने याबाबतची माहिती पोलिसांना दिली. सिंहगड पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कणसे यांनी घटनास्थळी भेट दिली.
शनिवारी (२९ मे) रात्री वायकुळे मित्राकडे पार्टी करायला गेला होता. तेथून मध्यरात्री तो नऱ्हे भागातील सोसायटीत परतला. सोसायटीच्या टाकीत नेमका कसा पडला, याची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.
पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करत असून याप्रकरणी सिंहगड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.





