ब्लूटूथ हेडफोनवर तरुणाई झिंगाट; पोलिसांच्या कारवाईला घाबरून केली ‘विशेष सोय’

पुणे – हॉटेल, पब आणि रेस्टॉरंटमध्ये डी.जे. किंवा साउंड सिस्टिमवर धिंगाणा केला जातो. यामुळे स्थानिक नागरिकांना त्रास होतो. हे लक्षात घेता, पोलिसांनी नियमित तपासणी सुरू केली आहे. दरम्यान, काही पब चालकांनी ब्लूटूथ कनेक्टेड हेडफोन उपलब्ध करून दिले आहेत. यातून ग्राहकांना संगीताचा आस्वाद घेता येईल आणि नियमही मोडला जाणार नाही, अशी शक्कल त्यांनी लढवली आहे.
पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी शुक्रवारी सर्व पोलीस ठाण्यांना आणि गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांना अशा आस्थापनांची झडती घेण्याचे आदेश दिले. यावर्षी जून अखेरपर्यंत पोलिसांनी 35 हॉटेल, पब आणि रेस्टॉरंटवर कारवाई केली आहे. यासंदर्भात दैनिक “प्रभात’शी बोलताना आयुक्त म्हणाले, “पब, हॉटेल्स चालकांनी कायद्याचे पालन करावे. त्यांच्याकडून समाजाला होणारा उपद्रव सहन केला जाणार नाही. परवान्यानुसार संगीत वाजवण्याची वेळ ठरवून दिलेली आहे. यातील काही व्यावसायिकांना रात्री दहा, तर काहींना रात्री साडेदहाची मुदत आहे. ही कारवाई मोकळ्या जागेतील आस्थापना आणि रूफ टॉप रेस्टॉंरंटशी संबंधित आहे. बंदिस्त जागेत चालणाऱ्या हॉटेल्स, रेस्टॉरंटना नियम पाळण्याचे, आवाज बाहेर जाणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन आहे.’
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले, “कोंढवा, मुंढवा, येरवडा, चंदननगर, वडगावशेरी, कोरेगाव पार्क आणि बाणेरमध्ये इमारतींवरील रेस्टॉरंट्स आणि काही हॉटेलांमुळे उपद्रव होत आहे. स्थानिक रहिवासी मोठ्या आवाजामुळे त्रस्त होतात आणि विशेषत: वीकेंडदरम्यान हा गोंगाट आणखी वाढतो. यामुळे झोपही लागत नाही, अशी तक्रार स्थानिक रहिवासी करतात. शिवाय, काही हॉटेल किंवा पब पहाटे 3.30 किंवा 4 पर्यंत मोठ्या आवाजात संगीत वाजवतात. या ठिकाणी वीकेंडला मोठ्या प्रमाणात तरुणांची गर्दी असते.
कारवाईच्या सूचना
- गुन्हे शाखेचे अधिकारी जास्तीत जास्त पब आणि हॉटेल्सना भेट देऊन डेसिबल पातळी तपासणार
- रात्री उशिरापर्यंत संगीत वाजवणारी रेस्टॉरंट आणि भोजनालये तपासण्याचे गस्ती पथकांना आदेश
- उल्लंघन करणाऱ्यांचे व्हिडिओ चित्रीकरण आणि डेसिबल पातळी तपासणी
- कारवाईत म्युझिक सिस्टिम आणि इतर साहित्यही जप्त होणार



