लंडन – लंडनमधील भारतीय रेस्टॉरंटची जाळपोळ केल्याबद्दल किशोरवयीन मुलासह एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. या रेस्टॉरंटला लागलेल्या आगीमध्ये ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. लिफोर्ड भागातल्या इंडियन एरोमा या रेस्टॉरंटला ही आग लावण्यात आली होती, असे महानगर पोलिसांनी शुक्रवारी सांगितले. रोहित कालुवाला हे व्यवस्थापक असलेल्या या भारतीय खाद्यपदार्थांच्या रेस्टॉरंटला आग लागली तेंव्हा तेथे भोजन घेत असलेले दोन पुरुष आणि ३ महिला गंभीर भाजल्या. त्यांना प्राथमिक उपचारानंतर रुग्णालयात नेण्यात आले. यापैकी एक महिला आणि एका पुरुषाची प्रकृती चिंताजनक आहे. आणखी दोघे जण या आगीमध्ये जखमी झाल्याची माहिती मिळते आहे. पण पोलीस पोचण्यापुर्वीच ते निघून गेले होते. त्यांचा शोध घेतला जातो आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. पण नक्की काय घडले याची सविस्तर माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचेही पोलिसांनी सांगितले. या आगीमुळे रेस्टॉरंटचे मोठे नुकसान झाले. काही लोक चेहऱ्यावर मास्क लावून रेस्टॉरंटमध्ये आले आणि त्यांनी काही ज्वालाग्रही पदार्थ ओतून आग लावल्याचे सीसीटिव्हीमध्ये दिसते आहे. त्यांचा शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे लंडनमधील भारतीय समुदायामध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. या घटनेशी संबंधित काहीही महत्वाची माहिती असल्यास पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. जोळपोळीच्या घटनेनंतर मोठ्या संख्येने रेस्टॉरंट असलेल्या वुडफोर्ड अव्हेन्यू, गॅन्टस हिल सारख्या भागांमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.