सरे (कॅनडा) – हास्य अभिनेता कपिल शर्माने अलिकडेच कॅनडामध्ये सुरू केलेल्या रेस्टॉरंटवर पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडली आहे. महिन्याभराच्या आत या रेस्टॉरंटवर गोळीबार होण्याची ही दुसरी वेळ असल्याचे सरे पोलिसांनी सांगितले. गुरुवारी पहाटेच्या सुमारास न्यूटन शेजारच्या रेस्टॉरंटसवर हा गोळीबार झाला असून सरे पोलिसांचे अधिकारी या घटनेचा तपास करत आहेत. पोलिसांनी या उद्योगाचे नाव सांगितले नाही. मात्र हे रेस्टॉरंट कपिल शर्मा यांच्या मालकीचे कॅप्स कॅपे असल्याचे माध्यमांनी म्हटले आहे. दिनांक ७ ऑगस्ट रोजी पहाटे ४ वाजून ४० मिनिटांनी १२० स्ट्रीटवरच्या ८४०० ब्लॉकमधील उद्योगाजवळ गोळीबार झाल्याचे सरे पोलीस सर्व्हिसच्या फ्रंटलाईन अधिकाऱ्यांना कळवण्यात आले. या गोळीबारात रेस्टॉरंटमधील कोणीही कर्मचारी जखमी झाले नाही. मात्र एकापेक्षा जास्त गोळ्या झाडल्या गेल्यामुळे खिडक्या आणि इमारतीचे नुकसान झाले. याच ठिकाणी दिनांक १० जुलै रोजी देखील असाच गोळीबार झाला होता, असे पोलिसांनी सांगितले. गेल्या महिन्यातल्या गोळीबाराच्या घटनेनंतर कॅफेने हिंसाचाराविरोधातल्या आपल्या भूमिकेवर आपण ठाम असल्याचे इन्स्टाग्रामवरच्या पोस्टमध्ये म्हटले होते. स्वादिष्ट कॉफी आणि मैत्रीपूर्ण संभाषणाद्वारे समुदायला आनंद मिळेल, या आशेने आम्ही कप्स कॅफे उघडले आहे. त्या स्वप्नाशी हिंसाचाराचा संबंध असणे हे हृदयद्रावक आहे. आम्ही या धक्क्याची दखल घेत आहोत पण आम्ही हार मानत नाही आहोत, असे कॅफेने आपल्या निवेदनात म्हटले होते. हा कॅफे ४ जुलै रोजी ब्रिटिश कोलंबियातील सरे येथे उघडण्यात आला आहे.