खालुंब्रे येथे एनडीआरएफच्या जवानांना यश
महाळुंगे इंगळे- नदीच्या पुरात तरुण दुपारपासून अडकल्याची विचित्र घटना चाकण-तळेगाव दाभाडे रस्त्यावरील खालुंब्रे
(ता. खेड) गावच्या हद्दीतील इंद्रायणी नदीच्या पत्रात शनिवारी (दि. 14) घडली.
एक तरुण नदीपात्रात अडकला असल्याची माहिती महाळुंगे इंगळे येथील स्थानिकांनी शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास पोलिसांना दिली. या घटनेची माहितीच्या अध्यारे पोलिसांनी सुदुंबरे येथील एनडीआरएफच्या जवानांना तातडीने घटनास्थळी पाचारण केले. त्या जवानांनी पावसाची रिमझिम सुरू असतानाही शर्थीचे प्रयत्न करून अथक परिश्रमातून त्या तरुणाची बोटीच्या सहाय्याने नदीच्या मध्यभागात जाऊन सुखरूप सुटका केली.
सुरेश लक्ष्मण धाबडघाव (वय 28, सध्या रा. खालुंब्रे, ता. खेड, मूळ रा.केशवनगर, ता. रिसोड, जि. वाशीम) असे सुखरूप सुटका करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. संबंधित तरुण नदीच्या मध्यभागी कसा पोहचला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. महाळुंगे इंगळे पोलीस चौकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भानुदास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विलास गोसावी व त्यांचे अन्य सहकारी याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत.