Nitesh Rane : देवेंद्र फडणवीसांना तुम्ही टार्गेट केलं, पण….; नितेश राणेंनी जरांगेंवर साधला निशाणा, त्या टीकेबाबत म्हणाले…

Nitesh Rane : मराठा आरक्षणावर राज्य सरकारने निर्णय घेत मनोज जरांगे यांनी केलेल्या ८ पैकी ६ मागण्या पूर्ण केल्या आहेत. तुमच्या ताकदीवर जिंकलो अशी विजयी गर्जना मनोज जरांगे यांनी आंदोलनाच्या पाचव्या दिवशी केली आणि आमरण उपोषण सोडलं. यानंतर मराठा बांधवांनी मुंबईत विजयी जल्लोष साजरा केला.
राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार हैदराबाद गॅझेटियर तातडीनं लागू करण्यात येणार आहे. तर सातारा गॅझेटिरमधल्या त्रुटी दूर करून त्यासाठी एका महिन्यांचा अवधी राज्य सरकारच्या वतीने देण्यात आला आहे. यामध्ये मूळ मागणी मराठा आणि कुणबी एकच आहे, यासाठी राज्य सरकारने दोन महिन्यांचा अवधी मागितला आहे.
२९ अॅागस्टपासून मराठा आरक्षणासाठी उभारलेल्या लढ्यातील यश मनोज जरांगेंना यांना मिळालं आहे. दरम्यान, भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी मराठा आरक्षणावर मनोज जरांगेंच्या मागण्या मान्य केल्यानंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मराठा समाजाची जुनी मागणी होती, मराठवाड्यात कुणबी नोंदी होत्या. त्यांना आरक्षण द्यावं. हैदराबाद गॅझेट प्रमाणे तो निर्णय आमच्या सरकारने घेतला असल्याची प्रतिक्रिया मंत्री नितेश राणे यांनी दिली आहे.
देवेंद्र फडणवीसांना तुम्ही टार्गेट केलं, पण…
जेव्हा जेव्हा मराठा समाजाने गुलाल उधळला, तो फक्त देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या कालावधीमध्ये. मराठा समाजाने याची दखल घेतली पाहीजे. प्रत्येक मराठा समाजातील नागरिकांने देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले पाहिजे, असं देखील मंत्री नितेश राणे म्हणाले आहेत.
आरक्षणाच्या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीकात्मक विधानं करण्यात आली होती. यावर बोलताना देवेंद्र फडणवीसांना तुम्ही टार्गेट केलं, पण त्याच देवेंद्र फडणवीसांनी तुम्हाला न्याय दिला, असं म्हणत नितेश राणेंनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं आहे.
त्या टीकेबाबत नितेश राणे म्हणाले…
मनोज जरांगे यांनी आमरण उपोषणस्थळावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीकात्मक विधानं केली होती. त्यांच्या विधानावरून मंत्री नितेश राणे यांनी जरांगेंना खडेबोल सुनावले होते. त्यानंतर जरांगेंनी थेट नितेश राणेंचा उल्लेख चिंचुद्री केला होता. त्यांनी केलेल्या या टीकेला नितेश राणे काय प्रत्युत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते, पण नितेश राणे यांनी यावर भाष्य करणं टाळलं आहे.
हेही वाचा : “दिल्लीला एक दिवस पश्चात्ताप करावा लागेल…” ; फारुख अब्दुल्ला असं का म्हणाले?, वाचा सविस्तर





