अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं, देवेंद्र फडणवीसांचं नाव घेत म्हणाले, आता..

मुंबई : मराठा आरक्षणाच्या लढ्यात ऐतिहासिक यश मिळाल्यानंतर मनोज जरांगे यांनी पाचव्या दिवशी आपले आमरण उपोषण मागे घेतले आहे. आझाद मैदानावर राधाकृष्ण विखे पाटील, जयकुमार गोरे, शिवेंद्रराजे भोसले, माणिकराव कोकाटे आणि उदय सामंत यांच्या शिष्टमंडळाने भेट दिल्यानंतर जरांगे यांनी हा निर्णय घेतला.
“फडणवीससाहेब, एकनाथ शिंदे, अजित दादा, कटुता संपवूया, इथे या,” असे भावनिक आवाहन जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांना केले होते. मात्र, विखे पाटील यांच्या विनंतीनंतर आणि आंदोलकांच्या संमतीने जरांगे यांनी विखे पाटील यांच्या हस्ते पाणी पिऊन उपोषण सोडले. “दमाने गाड्या चालवा, आता गावाकडे निघायचंय!” असे म्हणत त्यांनी मराठा बांधवांना घरी परतण्याचे आवाहन केले.
मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावे, यासाठी जरांगे यांनी आझाद मैदानावर तीव्र उपोषण सुरू केले होते. सरकारने त्यांच्या आठ मागण्या मान्य करत हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेटच्या अंमलबजावणीसह मराठा-कुणबी एकतेचा शासन निर्णय (जीआर) काढण्याचे आश्वासन दिले.
राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला पूर्ण अधिकार दिले. त्यांच्या पाठिंब्यामुळेच आम्ही मागण्या मान्य करू शकलो.” उदय सामंत यांनीही विखे पाटील यांना सर्व अधिकार असल्याचे स्पष्ट केले आणि उपोषण मागे घेण्याची विनंती केली.
मनोज जरांगेंच्या कोणत्या मागण्या मान्य?
- हैदराबाद गॅझेट अंमलबजावणीसाठी शासन निर्णय – मान्य
- आंदोलनातील मृतांच्या वारसांना आर्थिक मदत – मान्य
- आंदोलनातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी – मान्य
- मराठा आंदोलकांवरील केसेस मागे – मान्य
- प्रलंबित जात पडताळणीला मान्यता – मान्य
- आंदोलकांवरील गुन्हे घेण्यास मान्यता – मान्य
मनोज जरांगेंच्या कोणत्या मागण्या प्रलंबित?
- सातारा गॅझेट अंमलबजावणीसाठी – 1 महिन्याची मुदत
- मराठा-कुणबी एकच शासन निर्णय – 2 महिन्यांची मुदत





