Devendra Fadnavis : मनोज जरांगेंनी उपोषण सोडताच देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई : मराठा आरक्षणाच्या लढ्याला मोठे यश मिळाले असून, मनोज जरांगे यांनी आझाद मैदानावर पाचव्या दिवशी आपले आमरण उपोषण मागे घेतले. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “मराठा आणि ओबीसी समाजाला समोरासमोर न आणता आम्ही हा वाद कायदेशीर मार्गाने सोडवला आहे.
राज्यातील प्रत्येक समाजासाठी आम्ही काम करत आहोत आणि करत राहू.” मराठा समाजाला कुणबी (ओबीसी) दर्जा देण्यासाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा सरकारी ठराव (जीआर) जारी झाला असून, या यशाचे श्रेय फडणवीस यांनी मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि सर्व मंत्र्यांना दिले आहे.
नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
देवेन्द्र फडणवीस म्हणाले, जरांगे यांच्या सरसकट आरक्षणाच्या मागणीत कायदेशीर अडचणी होत्या. “कायद्यात सरसकट बसत नसेल तर सरसकट करू नका,” असे सांगत त्यांनी कायदेशीर चौकटीत राहून तोडगा काढल्याचे नमूद केले. “हैदराबाद गॅझेट लागू करण्यासाठी आम्ही सुरुवातीपासून तयार होतो.
सुप्रीम कोर्टात टिकेल असा कायदेशीर आधार घेऊन हा निर्णय घेतला,” असं फडणवीस यांनी ठामपणे सांगितले. मराठा समाजाच्या हितासाठी सखोल चर्चा करून सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या असून, सामाजिक सलोखा राखण्यावर सरकारचा भर आहे.





