Bihar Election : “खानदानी माफियांना बुलडोझरखाली चिरडून…”; CM योगींचा बिहारमधील विरोधकांनावर निशाणा

Bihar Election । Yogi adityanath : बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिवान येथे एनडीए उमेदवार मंगल पांडे यांच्या समर्थनार्थ झालेल्या सभेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जोरदार भाषण करत विरोधकांवर आणि माफियांच्या राजकारणावर निशाणा साधला.
सीएम योगी म्हणाले, “उत्तर प्रदेशमध्ये आम्ही माफियांना बुलडोझरखाली चिरडून जहन्नुमच्या रस्त्याने पाठवले आहे.” त्यांनी पुढे सांगितले की, काही “खानदानी माफिया” पुन्हा सत्तेवर येण्यासाठी प्रयत्न करत आहेत, परंतु जनता त्यांना यावेळी संधी देणार नाही.
योगी म्हणाले की, मागील २० वर्षांत मुख्यमंत्री नीतीश कुमारांच्या नेतृत्वाखाली बिहारमध्ये सुशासनाची पायाभरणी झाली आहे. “ज्यांनी बिहारची ओळख डागाळली, त्यांना पुन्हा राज्यात येऊ द्यायचं नाही. ही बिहारच्या अस्मितेची लढाई आहे,” असं त्यांनी ठामपणे सांगितलं.
राजद-काँग्रेसने गरीबांना लुटलं, विकास थांबवला :
मुख्यमंत्री म्हणाले की, राजद आणि काँग्रेसच्या राजवटीत गरीबांच्या योजना लुटल्या गेल्या, घरं बांधली गेली नाहीत, आणि तरुणांसमोर रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला. “ते लोक गरीबांचा राशन (अन्न) हिसकावतील, आणि जमीन हडपतील. यूपीमध्ये माफिया सपा सोबत आहेत आणि बिहारमध्ये राजद सोबत,” असा आरोप योगींनी केला.
धार्मिक भावनांनाही केला स्पर्श :
सीएम योगी यांनी धार्मिक भावनांनाही स्पर्श केला. त्यांनी सांगितले की, अयोध्येत भगवान रामचं आणि सीतामढीमध्ये माता सीतेचं मंदिर एनडीए सरकारकडून उभारलं जात आहे. त्यांनी म्हटलं, “काँग्रेस आणि राजदने नेहमीच भगवान राम आणि कृष्ण यांचा अपमान केला. नेहरूंनी डॉ. राजेंद्र बाबूंना सोमनाथ मंदिरात जाण्यास मनाई केली होती, पण त्यांनी ठामपणे पदाचा राजीनामा देऊनही तिथे जाण्याचा निर्णय घेतला.”
८.५ वर्षांत यूपीमध्ये एकही दंगा नाही :
योगी आदित्यनाथ म्हणाले की, उत्तर प्रदेशात गेल्या साडेआठ वर्षांत एकही दंगा झाला नाही. त्यांनी इशारा देत सांगितले, “दंगा कराल तर खानदानाची संपत्ती जाईल, आणि भिकही मिळणार नाही. माफियांचे जहन्नुमचे तिकीट आम्ही आधीच काढले आहेत.” ते म्हणाले की, विकसित बिहारसाठी एनडीए सरकार आवश्यक आहे, कारण एनडीए आधी काम करते आणि नंतर बोलते. असं देखील सांगितलं.





