Nagar | श्री क्षेत्र तारकेश्वर गडावर योग साधना शिबीर

पाथर्डी, (प्रतिनिधी): वेदांताचार्य वै .नारायण महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत महंत आदिनाथ शास्त्री यांच्या आदेशाने सेवा करण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य आहे. श्री क्षेत्र तारकेश्वर गडाचा निसर्गरम्य परिसर व अध्यात्मिकतेमुळे येथे साक्षात परमेश्वर वास्तव्यास आहे.
मेडिटेशनसाठी येथील वातावरण पोषक आहे. योगासने व ध्यान धारणेने येथे आध्यात्मिक वातावरणाची लवकर पायाभरणी होते.
मनुष्यातील ताण-तणाव नाहीसा होऊन प्रसन्नता निर्माण होते, असे प्रतिपादन योगगुरु भागवत खामकर गुरुजी यांनी केले .
श्रीक्षेत्र तारकेश्वर गड येथे योगगुरु खामकर गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली गडावरील विद्यार्थी व भाविकांसाठी योगासना व ध्यानधारणा शिबीर संपन्न झाले.
गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांच्यासह गडावरील विद्यार्थी व भाविक योग साधना शिबिरात सहभागी झाले होते .यावेळी महंत आदिनाथ शास्त्री यांनी शीर्षासनासह कठीण योगासने पूर्ण केली.
शास्त्रीजी दररोज पहाटे चार वाजता उठून व्यायाम करतात. योगासने करतात, ध्यानधारणा करतात, तलावात पोहतात.गोशाळा व शेतात काम करतात. त्यांची दिनचर्या तरुणांसाठी आदर्शवत आहे. समाजाने त्यांच्या या कृतीचा आदर्श घ्यावा, असे आवाहन खामकर यांनी केले.





