नात्याला काळिमा! पैशांच्या हव्यासापोटी नातवानेच केला आजीचा निर्घृण खून ; पुरावा नष्ट करण्यासाठी प्रेतही जाळले

प्रभात वृत्तसेवा
मिरी – अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मिरी गावात काही महिन्यांपूर्वी घडलेल्या वृद्ध महिलेच्या खुनाच्या थरारक प्रकरणाचा उलगडा अखेर पाथर्डी पोलिसांनी केला आहे. लोभ आणि पैशाच्या हव्यासापोटी नात्याचं पावित्र्य चिरडणाऱ्या नातवाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून, या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात संताप आणि खळबळ उडाली आहे.ही घटना ६ मे २०२५ रोजी घडली होती. मिरी येथील किसनबाई छगन मैदड (वय ७५) या वृद्ध महिलेला अज्ञात व्यक्तीने निर्दयीपणे मारहाण करून ठार केले होते.
पुरावे नष्ट करण्यासाठी तिचे प्रेत घरातच जाळण्यात आले होते. याप्रकरणी मृत महिलेची मुलगी छाया हरीश्चंद्र खोसे (रा. निंबेनांदूर) हिने दिलेल्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.तपासादरम्यान पोलिसांनी विविध अंगाने चौकशी करून तांत्रिक पुरावे गोळा केले. अखेर धक्कादायक सत्य उघड झाले. खून करणारा दुसरा कोणी नसून मृत महिलेचाच नातू सचिन सुरेश मैदड (वय ३०, रा. माळवाडी, वडगाव गुप्ता) हाच असल्याचे समोर आले.
तपासात उघड झाले की, किसनबाईंनी त्यांच्या नावावर असलेली दोन गुंठ्यांची जागा विकून दोन्ही नातवांना वाटून दिले होते. काही तुटपुंजी रक्कम स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी बँकेत ठेवली होती. त्या ठेवीत वारस म्हणून फक्त चैतन्यचं नाव असल्याने सचिनच्या मनात आजीबद्दल राग आणि मत्सर निर्माण झाला. या वैमनस्यातूनच त्याने आजीचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.यापूर्वी देखील सचिन याने संक्रांतीच्या वेळी आजीला त्याच्या नगर येथील घरी मारहाण करून तिला गंभीर जखमी अवस्थेत मिरी येथील घरी आणून टाकले होते.
याच कारणाने अखेर ६ मे रोजी त्याने आजीचा निर्दयीपणे खून करून पुरावे नष्ट करण्यासाठी प्रेत जाळले असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.आरोपी सचिन सुरेश मैदड याला अटक करण्यात आली असून, न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला १३ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. तपास पथकात स.फौ. नितीन दराडे, पो.हे.कॉ.बाबासाहेब बडे, पो.कॉ. ज्ञानेश्वर इलग आणि पो.कॉ. इजाज सय्यद यांचा समावेश आहे.





