Nagar | प्रशासकीय इमारतीची आ.राजळे यांच्याकडून पाहणी

पाथर्डी, (प्रतिनिधी) – पाथर्डी शहराच्या मध्यवर्ती असलेल्या व शहराच्या वैभवात व सौंदर्यात भर घालणाऱ्या गाळे, संकुल, प्रशस्त वाहनतळ, फर्निचरयुक्त दालने, लिप्ट ,अग्निशमक प्रतिबंधात्मक उपाययोजना,
सौरऊर्जा व इतर अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या पाथर्डी नगरपरिषदेच्या सुमारे सव्वाआठ कोटी रुपये निधीतून वीस हजार स्क्वेअर फुट क्षेत्रफळ असलेल्या चार मजली प्रशासकीय इमारतीचे बाहेरील सर्व काम पूर्ण झाले.
अंतर्गत फर्निचर व विद्युतीकरणाचे काम प्रगतीपथावर असून, लवकरच पूर्ण होऊन शहरवासियांच्या सेवेसाठी उपयोग केला जाणार असल्याची माहिती आमदार मोनिका राजळे यांनी दिली.
आमदार राजळे यांनी पाथर्डी नगर परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीची अधिकारी, पदाधिकाऱ्यांसमवेत पाहणी करून कामाबाबत सूचना केल्या.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष डॉ. मृत्यूंजय गर्जे, माजी उपनगराध्यक्ष बंडू बोरुडे, नंदकुमार शेळके, माजी नगरसेवक नामदेव लबडे, रमेश गोरे, बबन बुचकुल, मंगल कोकाटे,
दुर्गा भगत ,अनिल बोरूडे, रमेश हंडाळ, विष्णुपंत अकोलकर, मुकुंद गर्जे,अमोल गर्जे, बाजार समितीचे सभापती सुभाष बर्डे, उपसभापती कुंडलिक आव्हाड, नारायण पालवे, रविंद्र आरोळे, अशोक मंत्री, सुनिल ओव्हळ, जमीर आतार आदींसह भाजपा पदाधिकारी, नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी, ठेकेदार यावेळी उपस्थित होते.
आमदार मोनिका राजळे म्हणाल्या, राज्यात क वर्ग नगरपरिषदांमध्ये प्रथम क्रमांकावर असलेली सर्वात मोठी व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज तसेच पुढील किमान पन्नास वर्षाचा विचार करून अत्यंत भव्य व दर्जेदार प्रशासकीय इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे.
तळमजल्यावर सोळा व्यापारी गाळे आहेत. पहिल्या मजल्यावर स्वागत कक्ष, आरोग्य व कर विभाग, जन्म व मृत्यू विभाग तसेच नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष ,
विषय समिती सभापती यांच्यासाठी स्वतंत्र प्रशस्त दालन व सर्व सुविधायुक्त अत्याधुनिक बैठक हॉल आहे. दुसऱ्या मजल्यावर लेखा व वित्त विभाग, आस्थापना विभाग, नगररचना विभाग, बांधकाम विभाग, मुख्याधिकारी यांचा कक्ष आहे.
तिसऱ्या मजल्याचे बांधकाम पूर्ण झालेले असून, भविष्यात गरजेनुसार सभागृह व इतर प्रशासकीय बाबीसाठी वापर केला जाणार आहे.
प्रशासकीय इमारतीच्या तळ मजल्यावरील गाळ्यासमोरील बाजूस प्रशस्त वाहनतळ उपलध्ध असून, लँडस्किपिंगमुळे इमारतीच्या सौंदर्यात भर पडणार आहे.
बाहेरील बाजूस केलेल्या पॅनलिंगमुळे इमारत आकर्षक दिसत आहे. या सुसज्ज इमारतीचा लवकरच पाथर्डी शहरवासियांच्या सेवेसाठी उपयोगात येणार असल्याचे आमदार मोनिका राजळे यांनी सांगितले.





