Nagara | वीस विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा

पाथर्डी, (प्रतिनिधी): अन्नातून विषबाधा झाल्याने वीस विद्यार्थ्यांना खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गुरुवारी दाखल करण्यात आले. या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून विद्यार्थ्यांवर सध्या उपचार सुरू आहेत.
विषबाधा झालेले हे विद्यार्थी पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा येथील वृद्धेश्वर वारकरी संस्थेचे आहेत.
घटनेची माहिती मिळताच तालुका आरोग्य अधिकारी डॉ भगवान दराडे यांनी तिसगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल असलेल्या विद्यार्थ्यांची विचारपूस केली.
वृद्धेश्वर वारकरी संस्थेचे एकूण ३२ विद्यार्थी या ठिकाणी निवासी असून यातील २० विद्यार्थ्यांना गुरुवारी पहाटेपासून उलट्या आणि जुलाब होऊ लागल्याने त्यांना तातडीने तिसगाव येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
नेहमीप्रमाणे बुधवारी रात्रीचे जेवण करून हे विद्यार्थी झोपी गेले. त्यानंतर पहाटे त्यांना हा त्रास सुरू झाला. वारकरी संप्रदायाचे शिक्षण घेणारी विद्यार्थी वृद्धेश्वर वारकरी संस्थेमध्ये निवासी आहेत. या ठिकाणी विद्यार्थ्यांना जेवण बनवून दिले जाते.
त्यातून विषबाधा होऊन या विद्यार्थ्यांना जुलाब आणि उलट्याचा त्रास झाला. सर्व विद्यार्थ्यांवर औषध उपचार करण्यात आले असून, सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी दराडे म्हणाले.





