योगगुरू बाबा रामदेव यांच्या अडचणीत वाढ; अजामीनपात्र वॉरंट जारी, काय आहे नेमकं प्रकरण?

Baba Ramdev | योगगुरू बाबा रामदेव यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. केरळमधील एका न्यायालयाने त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. रामदेव बाबांसोबत पतंजलि योगपीठाचे अध्यक्ष आचार्य बालकृष्ण यांच्याविरोधातही वॉरंट जारी करण्यात आले आहे.
नेमकं काय आहे प्रकरण ?
पलक्कड जिल्हा न्यायालयाने एका याचिकेच्या सुनावणीवेळी बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण गैरहजर राहिल्यामुळे हे अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. न्यायालयाने दोघांविरुद्ध १५ फेब्रुवारी रोजी हजर राहण्याचे अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. यापूर्वी १ फेब्रुवारी रोजी न्यायालयाने जामीनपात्र वॉरंट जारी केले होते, जेणेकरून ते न्यायालयात हजर राहू शकतील.
मात्र केरळच्या ड्रग्ज इन्स्पेक्टरने दिव्या फार्मसीविरुद्ध दाखल केलेल्या फौजदारी खटल्याच्या सुनावणीला हे दोघेही गैरहजर होते. हे प्रकरण दिव्या फार्मसीने प्रकाशित केलेल्या कथित दिशाभूल करणाऱ्या वैद्यकीय जाहिरातींशी संबंधित आहे. Baba Ramdev |
दरम्यान, योगगुरु बाबा रामदेव आणि पतंजलि आयुर्वेद लिमिटेडवर अनेक गुन्हे दाखल आहेत. यात खोट्या जाहिराती, अवमान, ट्रेडमार्क उल्लंघन यांचा समावेश आहे. पंतजलिच्या खोट्या जाहिराती प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने बाबा रामदेव आणि पतंजलि आय़ुर्वेद लिमिटेडचा माफीनामा स्वीकारला होता. या प्रकरणातील अब्रुनुकसानीचं प्रकरण बंद करण्यात आलं होतं.
पतंजलि कापूर उत्पादनांच्या विक्रीवर बंदी प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने पतंजलिला ४ कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. इंडियन मेडिकल असोसिएशनने बाबा रामदेव यांच्यावर कोरोना बरा करण्याचा दावा केल्याचा आणि आधुनिक औषधांना निरुपयोगी म्हणल्याचा आरोप केला होता. Baba Ramdev
या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने रामदेव बाबा आणि पतंजलिला दिलासा दिला. मात्र न्यायालयाने जर पुन्हा न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन केलं तर शिक्षा होऊ शकते, असा इशारा दिला होता. Baba Ramdev |
हेही वाचा:





