Pune News : न्यायालयातील हल्ल्याचा निषेध; मात्र पुणे पोलिसांच्या पाठीशी ठामपणे उभे राहा!
पुणे न्यायालयाच्या परिसरात अलीकडेच झालेल्या हल्ल्याच्या घटनेचा मध्यवर्ती पुण्यातील प्रमुख सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे.

Pune News : पुणे न्यायालयाच्या परिसरात अलीकडेच झालेल्या हल्ल्याच्या घटनेचा मध्यवर्ती पुण्यातील प्रमुख सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे; मात्र, या घटनेच्या निषेधाच्या नावाखाली संपूर्ण पोलीस यंत्रणेचे मनोबल खच्ची होणार नाही, याचीही काळजी घेण्याचे आवाहन मंडळांनी केले आहे.
पुणे पोलिसांच्या आजवरच्या कामगिरीची दखल घेत नागरिकांनी पोलीस प्रशासनाच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे, असे आवाहन संयुक्त निवेदनाद्वारे करण्यात आले आहे. न्यायालयासारख्या महत्त्वपूर्ण ठिकाणी हल्ल्याची घटना घडणे ही अत्यंत खेदजनक आणि चिंताजनक बाब आहे.
अशा घटनांमुळे पुण्याच्या शांतताप्रिय आणि सांस्कृतिक परंपरेला बाधा पोहोचते. त्यामुळे या प्रकरणाचा योग्य तपास करून दोषींवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे, अशी भूमिका मंडळांनी मांडली आहे. मात्र, एखाद्या दुर्दैवी घटनेवरून संपूर्ण पोलीस दलाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे योग्य नाही.
गेल्या तीन वर्षांत पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली पुणे पोलिसांनी गणेशोत्सवातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी, लाखोंच्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी आणि उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी उल्लेखनीय काम केले आहे. विविध गुन्ह्यांवरील कारवाई, अपघात व्यवस्थापन आणि मोठ्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश अशा अनेक बाबींमध्येही पोलिसांची कामगिरी अभिनंदनीय असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
‘भेसळमुक्त महाराष्ट्र, अतिक्रमणमुक्त पुणे आणि भयमुक्त पुणे’ हे आपले सामूहिक ध्येय आहे. हे साध्य करण्यासाठी सक्षम पोलीस प्रशासन आणि जागरूक नागरिक यांच्यात विश्वास, सहकार्य आणि समन्वय असणे आवश्यक आहे. त्यामुळे दोषींवर कठोर कारवाईची मागणी करतानाच कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांचे मनोधैर्य उंचावणे ही समाजाचीही जबाबदारी असल्याचे मंडळांनी स्पष्ट केले.
या संयुक्त निवेदनावर श्री कसबा गणपती, गुरुजी तालीम, तांबडी जोगेश्वरी, तुळशीबाग, केसरीवाडा, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी, अखिल मंडई, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, जिलब्या मारुती, हुतात्मा बाबू गेणू, खडकमाळ, सेवा मित्र (शुक्रवार पेठ), आदर्श मित्र (धनकवडी), साईनाथ (बुधवार पेठ) आणि संजीवनी मित्र (सहकारनगर) या गणेशोत्सव मंडळांच्या प्रतिनिधींनी भूमिका मांडली आहे.






