pune: शिवाजीनगर न्यायालयाजवळ भरदिवसा थरार
pune:

पाच जणांकडून तरुणावर गोळीबार, कोयत्याने वार
pune: शहरात वैमनस्यातून कोयते उगारून दहशत माजविण्याच्या घटना वाढल्या असताना वर्दळ आणि संवेदनशील असलेल्या शिवाजीनगर न्यायालयाजवळ बुधवारी (दि. २५) थरकाप उडविणारी घटना घडली.
भावाच्या खून प्रकरणातील आरोपी न्यायालयीन कामकाजासाठी आला असताना त्याला न्यायालयासमोर गाठून हल्लेखोरांनी कोयत्याने वार केले. त्याच्यावर पिस्तुलातून गोळीबार केला. हल्लेखाेरांना विरोध करणाऱ्या सराइताचे दोन्ही पंजे कोयत्याने वार केल्याने तुटले. दुपारी सव्वाएक वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.
मंदार मारुती किवळे (वय ३५, रा. नवीन वसाहत, कात्रज) असे गंभीर जखमीचे नाव आहे. कात्रज भागातील संतोषनगरमध्ये शुभम सुभाष चव्हाण (वय २८, रा. कात्रज) याचा २० एप्रिल रोजी जमिनीच्या वादातून खून झाला होता. या प्रकरणात मंदार किवळे, अमर दिलीप साकोरे, गिरीष सुभाष वावरे, योगेश बाबूराव डोरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे.
याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या किवळे याला जामीन मंजूर झाल्याने तो १८ नोव्हेंबर रोजी कारागृहात बाहेर आला. आज न्यायालयीन कामकाजासाठी शिवाजीनगर न्यायालयाच्या आवारात निघाला होता. त्या वेळी दुचाकीवरून आलेल्या पाच जणांनी किवळेला गाठले. त्यच्यावर पिस्तुलातून गोळीबार केला. त्यानंतर त्याच्यावर कोयत्याने वार करण्यास सुरुवात केली. आरोपींनी केलेल्या हल्ल्यात किवळे गंभीर जखमी झाला. त्याच्या दोन्ही हातांचे पंजे तुटले. या घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त गौहर हसन यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी घाव घेत तपास सुरू केला.
मदतीसाठी कोणीही धजावले नाही
हल्लेखाेरांनी हल्ला केल्यानंतर गंभीर जखमी झालेला किवळे हा मदतीसाठी याचना करत होता. मात्र, हल्लेखोरांनी कोयते उगारल्यानंतर त्याच्या मदतीसाठी कोणीही धावले नाही. हल्लेखोर दोन दुचाकीवरून पसार झाल्यानंतर जखमी अवस्थेतील किवळे हा दहा ते बारा मीटर अंतर चालत गेला. मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्यानंतर तो बेशुद्ध पडला. काही अंतरावर असलेल्या न्यायालयीन बंदोबस्तातील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर गंभीर जखमी अवस्थेतील किवळे याला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले.
शिवाजीनगर न्यायालयासमोर झालेल्या हल्ल्यातील आरोपींची ओळख पटलेली आहे. त्यांना पकडण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. आरोपींनी मंदार किवळे याच्यावर पिस्तुलातून गोळीबार केला आहे. प्राथमिक तपासणीत त्याच्या शरीरात गोळ्या शिरल्या नसल्याचे उघडकीस आले आहेत. आरोपींनी तीक्ष्ण शस्त्राने वार केल्याने तो गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. घटनास्थळावरून दोन पिस्तुले जप्त केली आहेत.
– गौहर हसन, पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा





