Yerwada Jail: जेलच्या बाहेर मित्रासाठी फटाक्यांची आतषबाजी; रील व्हायरल होताच पोलिसांची धडक कारवाई
Yerwada Jail: सुरक्षा भिंतीलगतच घडला प्रकार; उपायुक्त चिलुमुला रजनीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली येरवडा पोलिसांची तात्काळ कारवाई.

Yerwada Jail – येरवडा मध्यवर्ती कारागृहाच्या संरक्षण भिंतीलगत फटाके उडवून कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या आरोपीचा वाढदिवस साजरा केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. त्याने फटाके उडवताना व्हिडीओ तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल करीत गुन्हेगारीचे समर्थन केले. शंकर बाळासाहेब भालके (वय १९, रा. धनकवडी) याला पोलिसांनी अटक केली आहे.
येरवडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपीने कारागृहाबाहेर भिंतीलगत फटाके उडवून कारागृहात असलेल्या मित्राचा वाढदिवस साजरा केला. त्याचा व्हिडिओ व्हायरल केला, त्यानुसार पथकाने शंकर भालके याला ताब्यात घेतले. त्याने आरोपी सुलतान सय्यद याच्या वाढदिवसानिमित्त मित्रांच्या मदतीने येरवडा मध्यवर्ती कारागृहाच्या संरक्षण भिंतीजवळ वाहतुकीस अडथळा निर्माण करत फटाके फोडले.
या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल केला. जेलमधील आरोपीचे उदात्तीकरण करून समाजात चुकीचा संदेश देण्याचा प्रयत्न केला. येरवडा पोलिसांनी संबंधित आरोपीला अटक केली असून, सोशल मीडियाच्या माध्यमातून गुन्हेगारांचे समर्थन किंवा उदात्तीकरण करणाऱ्यांसह व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.
ही कारवाई उपायुक्त चिलुमुला रजनीकांत, एसीपी सुनील जैतापूरकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते, पोलीस उपनिरीक्षक किशोर बेरड, हवालदार पिलाणे, मुकुंद कोकणे, शैलेश वाबळे, बालाजी सोनगे, संदीप जायभये, नटराज सुतार, गणेश पालवे, साईनाथ म्हस्के, अनिल म्हन्हाळकर, सोमनाथ गायकवाड यांनी केली.





