Pune News : ग्राहकांचे ‘बुकिंग’ करून अनैतिक व्यापार चालवणाऱ्या दोघांना अटक; येरवडा पोलिसांची मोठी कारवाई
Pune News : फोनवरून ग्राहकांचे ‘बुकिंग’ करून महिलांना अनैतिक व्यापारासाठी लॉजवर पाठविणाऱ्या रॅकेटचा येरवडा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

Pune News : ग्राहकांचे फोनवरून ‘बुकिंग’ करून महिलांना अनैतिक व्यापारासाठी लॉजवर पाठविणाऱ्या दोघांना येरवडा पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी कारवाई करून दोन पीडित महिलांची सुटका केली आहे. राज राजेशाम सविता ( २८, रा. खराडी) आणि सुनिल शिवाजी शिंदे ( ३७, रा. काळेपडळ, हडपसर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. (Pune News)
येरवडा परिसरात अनैतिक मानवी व्यापार सुरू असल्याची माहिती पोलिस हवालदार रामेश्वर नवले यांना मिळाली होती. येरवडा येथील एका हॉटेलमध्ये एक दलाल आणि त्याचे साथीदार ग्राहकांशी फोनवर संपर्क साधून महिलांचे ‘बुकिंग’ करीत असल्याचे तसेच ठराविक रक्कम घेऊन ग्राहकांच्या मागणीनुसार कल्याणीनगर, येरवडा परिसरातील लॉजवर महिलांना पाठविले जात असल्याची माहिती होती. (Pune News)
वरिष्ठ पोलिस निरीक्षक उमेश गिते यांच्या आदेशानुसार बनावट ग्राहक पाठवून हॉटेलवर पाळत ठेवण्यात आली. योग्य खात्री झाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकून अनैतिक व्यापारासाठी प्रवृत्त केलेल्या दोन महिलांची सुटका केली. (Pune News)
महिलांकडे चौकशी केली असता त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार हा व्यवसाय करवून घेणाऱ्या आरोपींचा शोध घेण्यात आला. तपास पथकाने अप्पर खराडी रोड परिसरात सापळा रचून राज सविता आणि सुनिल शिंदे यांना ताब्यात घेतले. न्यायालयाने दोन्ही आरोपींना पोलिस कोठडी सुनावली असून पुढील तपास सुरू आहे. (Pune News)
ही कारवाई पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलिस आयुक्त संजय दराडे, अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील, पोलिस उपायुक्त चिलुमूला रजनीकांत, सहायक पोलिस आयुक्त सुनिल जैतापुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक उमेश गिते, गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक शारदा कोकाटे, केशव दिंडे तसेच तपास पथकाचे पोलिस उपनिरीक्षक किशोर बेरड आणि त्यांच्या पथकाने केली. (Pune News)





