येरवडा प्रभाग क्र. 9 मोठ्या लोकसंख्येचा

येरवडा (संदिप घोडके) – पुणे महानगरपालिकेच्या प्रभागाचा प्रारूप आराखडा जाहीर झाला. शहरातील सर्व प्रभागांपैकी येरवडा प्रभाग क्र. 9 हा सर्वांत लोकसंख्या असलेला प्रभाग मानला जात आहे. या प्रभागाची लोकसंख्या 71,390 इतकी आहे. बहुतांश झोपडपट्टीचा भाग असलेला या प्रभागात तीन शिवसेनेचे आणि एक एमआयएमची नगरसेविका आहे.
या प्रभागात येरवडा गाव, काश्मिरी कॉलिनी, शिला साळवेनगर, अशोक नगर, लक्ष्मीनगर, गुंजन सिनेमा, तारकेश्वर मंदिर, यशवंतनगर, मदर तेरेसा नगर, भाटनगर, कुमार आंगण, रामनगर, जयजवान नगर, स्व. राजीव गांधीनगर असा पूर्वीचाच भाग असून नवी खडकी आणि सुभाषनगर, बाराथे वस्ती,नेताजीनगर यासह काही भाग हा नागपुरचाळ कल्याणीनगरला जोडलेला आहे. हरीगंगा सोसायटी, आंबेडकरनगर हा भाग कळस फुलेनगर या प्रभागाला जोडला आहे. त्यामुळे विद्यमान नगरसेवकांना पुन्हा संधी असली तरी एका नगरसेवकाला पदाला मुकावे लागेल.
महापालिकेच्या 2017 मध्ये जाहीर झालेल्या चार जणांच्या प्रभागाला असलेली रचना यंदाही कायमच राहिल्याने विद्यमानासह इच्छुकांनाही संधी मिळाली आहे. पूर्वी जसा प्रभाग होता तसाच असल्याने विद्यमानांमध्ये प्रचंड आनंदाचे वातावरण असले तरी त्यांच्या विरोधात नव्या इच्छुकांनीही कंबर कसली आहे. शिवसेनेचे विद्यमान तीन नगरसेवक असून मागील निवडणुकीत झालेले पराभव हे अगदी किरकोळ मतांच्या फरकाने आहेत. प्रभागात कॉंग्रेसला मानणारा वर्ग असला तरी मागील वेळी शिवसेनेच्या पारड्यात मतदारांनी कौल दिला होता. यंदा विधानसभेला मतदारांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मदत केल्याने राष्ट्रवादीच्या इच्छुकांमध्येही वाढ झाली आहे. मात्र, महाविकास आघाडी होते की स्वतंत्र निवडणुका लढविल्या जाणार, यावर अनेक उमेदवारांचे भवितव्य आहे. महाविकास आघाडी झाली तर तीनही पक्षांना उमेदवार देताना नाकीनऊ येणार आहेत. तसेच, भारतीय जनता पक्षाचे इच्छुक उमेदवारांनी तयारी केली असली तरी भाजपातही उमेदवारीही देताना डोकेदुखी होऊ शकते.





