अमित शहांना भेटल्यानंतर मंत्रिमंडळाचा निर्णय घेणार-येडियुरप्पा

नवी दिल्ली : सत्तासंघर्षाच्या राजकिय नाट्यानंतर सत्तेत आलेल्या कर्नाटकमधील येडियुरप्पांच्या मंत्रिमंडळाचा निर्णय आणखीही झाला नाही. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांनी आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटल्यानंतरच आपल्या मंत्रिमंडळाचा निर्णय घेणार असल्याचे म्हटले आहे.
कर्नाटकात नुकतेच सत्ता परिवर्तन झाले असून मुख्यमंत्रीपदी येडीयुरप्पा यांची पुन्हा एकदा वर्णी लागली. परंतू, शपथविधीपासून आतापर्यंत मंत्रिमंडळाचा कोणताही निर्णय घेण्यात आला नाही त्यामुळे विरोधकांनी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. दरम्यान, यावरच उत्तर देताना येडियुरप्पा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आपण लवकरच भेट घेणार आहोत तसेच राज्याच्या विकासासाठी केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे म्हटले. तसेच राज्याच्या मंत्रिमंडळाचा निर्णय हा अमित शहा यांना भेटल्यानंतर घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले. दरम्यान, यापुर्वी 7 ऑगस्टला येडियुरप्पा मंत्र्यांची यादी घेवून केंद्रात गेले होते परंतू, देशातील पुरपरिस्थितीचा मुद्दा सध्या गंभीर असून त्याकडे आपण लक्ष देणार असल्याचे अमित शहा यांनी म्हटले होते. त्यामुळे येडियुरप्पांना रिकाम्या हातांनी त्यावेळी परतावे लागले होते.





