YCMOU Exam 2026 : कॉपीबहादरांचे धाबे दणाणले! मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा केंद्रांवर असणार ‘हा’ हायटेक पहारा
YCMOU Exam 2026 : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अंतिम परीक्षांसाठी सर्व परीक्षा केंद्रांवर एआय सक्षम सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची कडक निगराणी.

YCMOU Exam 2026 – यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा यंदा अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या नजरेखाली पार पडणार आहेत. उद्या, गुरुवारपासून सुरू होणाऱ्या परीक्षांमध्ये कॉपीबहादरांना चाप लावण्यासाठी आणि परीक्षा अधिक सुरक्षित करण्यासाठी सर्व ५५६ परीक्षा केंद्रांवर ए. आय. (कृत्रिम बुद्धिमत्ता) सक्षम सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची कडक निगराणी ठेवली आहे. विद्यापीठाच्या या डिजिटल क्रांतीमुळे आता परीक्षा कक्षातील प्रत्येक हालचालीवर थेट मुख्यालय आणि पुणे विभागीय केंद्रातून नजर ठेवलेली असेल.
२१ मे ते १३ जून २०२६ दरम्यान चालणाऱ्या या अंतिम परीक्षांचे संपूर्ण महाराष्ट्रात नियोजन केले आहे. पुणे विभागीय केंद्रांतर्गत येणाऱ्या चार जिल्ह्यांमधील ८६ केंद्रांसह राज्यातील सर्वच केंद्रांवर ही विशेष यंत्रणा कार्यान्वित केली आहे. कुलगुरू डाॅ. संजीव सोनवणे, प्र. कुलगुरू डॉ. बिसेन, परीक्षा नियंत्रक डॉ. बी. पी. पाटील आणि पुणे केंद्राचे वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार डॉ. व्ही. बी. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हा हायटेक मास्टरप्लॅन तयार केला आहे.
हायटेक मास्टरप्लॅन
यंदा केवळ भरारी पथके किंवा वरिष्ठ पर्यवेक्षकच नाही, तर सीसीटीव्हीच्या माध्यमातून प्रश्नपत्रिका डाउनलोड करण्यापासून, झेरॉक्स काढणे आणि उत्तरपत्रिका सील करण्यापर्यंतच्या सर्व प्रक्रिया ऑनलाईन ट्रॅक केल्या जातील. याचे थेट नियंत्रण नाशिक मुख्यालय आणि पुणे विभागीय केंद्रात असणार आहे. या अत्याधुनिक डिजिटल उपाययोजनांमुळे मुक्त विद्यापीठाची परीक्षा पद्धत अधिक सक्षम, पारदर्शक, भयमुक्त आणि संपूर्णपणे विश्वासार्ह होईल, असा ठाम विश्वास विद्यापीठ प्रशासनाने व्यक्त केला आहे.




