दिव्यांग विद्यार्थ्याच्या जिद्दीला पावलांचे बळ! मुक्त विद्यापीठाच्या सूरजने पायाने लिहून दिली बीएची परीक्षा (Video)

पुणे – अडचणी कितीही येवोत, मनाचा ठाम निग्रह आणि अथक परिश्रमाने त्यावर मात करता येते. समाजात अशी दुर्मिळ उदाहरणे दिसतात, जी आपल्याला परिस्थितीसमोर न खचता लढण्यासाठी प्रेरीत करतात. जन्मतःच अपंग असलेला सूरज मुजावर यानेही आपल्या इच्छाशक्तीच्या बळावर अपंगत्वावर मात करून पायाने पेपर सोडवत एक आदर्श निर्माण केला आहे.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या पुणे विभागीय केंद्रांतर्गत एक दिव्यांग विद्यार्थी प्रथम वर्ष बीएच्या परीक्षेत चक्क पायाने पेपर लिहीत आहे. जन्मत:च अपंग असलेल्या सूरज शब्बीर मुजावर (वय 21, रा. पानीव) याने जवळपास १३ पानी पेपर पायाने सोडवला आहे. त्यामुळे त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
मुक्त विद्यापीठाच्या पुणे विभागीय केंद्रांतर्गत प्रथम वर्ष बीएच्या वर्गात श्रीराम शिक्षण महाविद्यालय, पानीव, ता. माळशिरस, जि. सोलापूर या अभ्यास केंद्रातून प्रवेश घेतला आहे. सूरज हा दुष्काळी भागातील गरीब कुटुंबातील विद्यार्थी असून, तो जन्मत: अपंग आहे त्याला दोन्ही हात नाहीत. त्याचे उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी मुक्त विद्यापीठात प्रवेश घेतला आहे.
उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी सूरजच्या जिद्दीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. सूरज हा अपंग असल्याने विद्यापीठाकडून परीक्षेसाठी वाढीव वेळ, स्वतंत्र लेखनिक, वेगळा वर्ग देणे या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याची तयारी असतानाही त्याने नियमित विद्यार्थ्यांबरोबर स्वत: पेपर लिहिण्याची तयारी दाखविली, हे विशेष म्हणावे लागेल. सध्या मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा सुरू असून, दोन- तीन दिवसांत या परीक्षा संपणार आहेत. सूरजला सर्वतोपरी सहकार्य करण्यात येत असल्याची माहिती विद्यापीठाचे पुणे विभागीय केंद्राचे वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार डाॅ. व्ही. बी. गायकवाड यांनी दिली.
उपजिल्हाधिकारी होण्याचं स्वप्न –
सूरजने खूप शिकावं अशी त्याच्या वडीलांची ईच्छा आहे. सूरजने इयत्ता दहावीला 63 टक्के तर 12 वीला (सायन्स) 65 टक्के गुण मिळवले आहेत. तो अकलूज येथील महाविद्यालयात बीएससी अॅग्रीच्या तृतीय वर्षात आहे. सूरज हा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असून उपजिल्हाधिकारी होण्याचं त्याचं स्वप्न आहे. एका बाजूला बीएससी अॅग्री, तर दुसरीकडे बीएची पदवी तो घेत आहे. स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासात सामान्य ज्ञानाची भर पडावी यासाठी तो बीए करत आहे. शिक्षणाबाबत जिद्द, जोश आणि चिकाटी कशी असावी याचं सूरज मूर्तीमंत उदाहरण बनला आहे.
जिद्दीला सलाम! जन्मत: दोन्ही हात नसलेला सुरज पायाने पेपर लिहून देतोय B.A.ची परीक्षा, मोत्यासारखं अक्षर… यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या कला शाखा प्रथम वर्षाच्या (F.Y.B.A.) परीक्षा सुरु आहेत. जन्मत: दोन्ही हात नसलेला सुरज पायाने पेपर लिहून परीक्षा देत आहे. pic.twitter.com/IaQNIDeYPl
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) May 28, 2024
“अपंग असतानाही सर्वतोपरी मदत करण्याची विद्यापीठाची भूमिका आहे. मात्र, सूरज हा कुणाचीही मदत न घेता चक्क पायाने परीक्षा देत आहे, ही बाब प्रसंशनीय आहे.”
– कुलगुरू डाॅ. संजीव सोनवणे, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ




