Yavat News | Social Media Post | Violence । Devendra Fadnavis : पुणे जिल्ह्यातील यवत गावात पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. शुक्रवारी (दि. १ ऑगस्ट) सकाळी यवतमधील एका मुस्लिम युवकाने सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्यानंतर गावात प्रचंड संतापाची लाट उसळली. या घटनेनंतर काही तासांतच, दुपारी १२ वाजेनंतर यवतचा आठवडे बाजार बंद करण्यात आला, आणि परिसरात तणाव वाढू लागला. तर दुसरीकडे यवत मध्ये काही दुचाकी गाड्या पेटवून देण्यात आल्या असून मस्जिदची देखील तोडफोड करण्यात आली आहे. या प्रकारामुळे सध्या यवत गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे 26 जुलै रोजी यवतमधील नीलकंठेश्वर मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झालेल्या घटनेचा संताप अद्याप शमलेला नसतानाच, अवघ्या काही दिवसांतच दुसरा वादग्रस्त प्रकार घडल्याने संपूर्ण परिसरात वातावरण निर्माण झाला आहे. देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले? दरम्यान, या संपूर्ण घटनेवर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, “मी या घटनेबाबत माहिती घेतली आहे. त्या ठिकाणी एका बाहेरच्या व्यक्तीने कुठल्यातरी पुजाऱ्याने बलात्कार केला असं स्टेटस ठेवल्याने हा तणाव निर्माण झाला आहे. यवतमध्ये आता शांतता आहे : त्यामुळे लोकं रस्त्यावर आली, जमावाला पांगविण्यासाठी लाठीचार्जही करावा लागला. आता परिस्थिती नियंत्रणात आहे. दोन्ही समाजाची लोकं एकत्र बसलेली आहेत, तणाव कमी करण्याचे काम सुरु आहे. जाणीवपूर्वक असा तणाव निर्माण करण्याचे काम केलं जात आहे, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. यवतमध्ये आता शांतता आहे. समोर आलेले व्हिडिओ यवतमधील आहेत की बाहेरील आहेत हे बघावं लागेल. अशा प्रकरणांमध्ये बाहेरचे व्हिडिओ दाखवले जातात. याची चौकशी केली जाईल. मी लोकांना शांतता राखण्याचे आणि कायदा हातात न घेण्याचे आवाहन करतो. असं मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले. दौंडचे आमदार काय म्हणाले? दरम्यान, दौंडचे आमदार राहुल कूल यांनी याबाबत बोलताना सांगितले की, यवतमध्ये गेले दोन तीन दिवस तणावपूर्ण वातावरण होतं. सर्वांशी संपर्क करुन तणाव निवळण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरु होते. आता तिथे जमाव जमला आहे, त्यामुळे पोलिसांचा मोठा फौजफाटाही तैणात करण्यात आला आहे. आन्ही परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत. असं ते म्हणाले आहेत. अफवांवर विश्वास ठेऊ नका : सोशल मीडियावर पोस्ट करणारा युवक यवत भागातील सहकार नगर भागात राहत असून स्थानिक कार्यकर्त्यांनी सहकार नगर भागात धाव घेत त्याच्या घराची तोडफोड देखील केली आहे. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला असला तरी युवकाच्या घराची हानी झाल्याचे निदर्शनास आले आहे. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत तातडीने बंदोबस्त वाढवला आहे. तसेच, वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी हजर असून, नागरिकांनी शांतता राखावी आणि अफवांवर विश्वास न ठेवावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.