Sharad Pawar : शरद पवार देवेंद्र फडणवीसांना भेटणार, नेमकी चर्चा काय होणार ? उत्सुकता शिगेला

मुंबई : पावसाळी अधिवेशनादरम्यान सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमधील तणावपूर्ण वातावरणाच्या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रविवारी (२७ जुलै) भेट होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
विधिमंडळातील नितीन देशमुख यांच्यावरील हल्ल्याचा वाद आणि कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा ऑनलाइन रमी खेळतानाचा व्हायरल व्हिडिओ यामुळे अधिवेशन गाजले होते. या घटनांमुळे सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी यांच्यातील संबंध तणावपूर्ण बनले आहेत. अशा परिस्थितीत पवार आणि फडणवीस यांची भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.
पावसाळी अधिवेशनात आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी (शरद पवार गट) नेते जितेंद्र आव्हाड यांचे सहकारी नितीन देशमुख यांच्यावर विधिमंडळाच्या लॉबीत हल्ला केला होता. या घटनेने महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.
नितीन देशमुख आणि पडळकर यांच्या एका कार्यकर्त्याला पोलिसांनी अटक केली होती. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांची गाडी अडवल्याने गदारोळ उडाला होता. दोन्ही कार्यकर्त्यांना नंतर जामिनावर सोडण्यात आले, पण या प्रकरणामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमधील वाद चिघळला.
या घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. “राज्यातील जनता आमदारांना शिव्या देत आहे. आमदार माजले आहेत,” असे खडेबोल त्यांनी सुनावले. याशिवाय, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा सभागृहात ऑनलाइन रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने आणि त्यांच्या शेतकऱ्यांबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सत्ताधारी महायुतीवर टीकेची झोड उठली आहे. विरोधकांनी कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी तीव्र केली आहे, आणि या सर्व घडामोडींमुळे राजकीय वातावरण तापले आहे.
शरद पवार-फडणवीस भेटीचे महत्त्व काय?
या तणावपूर्ण परिस्थितीत शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. शनिवारी (२६ जुलै) सकाळी नितीन देशमुख यांनी शरद पवार यांची भेट घेऊन विधिमंडळातील हल्ल्याच्या घटनेबाबत सविस्तर माहिती दिली असल्याची शक्यता आहे.
पवार-फडणवीस भेटीत विधिमंडळातील वाद, कोकाटे यांच्यावरील आरोप, आणि राज्यातील राजकीय संस्कृती सुधारण्यासाठी उपाययोजनांवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे. याशिवाय, शेतकऱ्यांचे प्रश्न, लाडकी बहीण योजनेतील घोटाळा, आणि कंत्राटदार हर्षल पाटील यांच्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवरही या भेटीत महत्त्वपूर्ण निर्णय होऊ शकतात.





