Yashasvi Jaiswal created history : भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना चेन्नईच्या मैदानावर खेळवला जात आहे. या कसोटी सामन्यात टीम इंडियाने पहिल्या डावात 376 धावा केल्या होत्या. यानंतर बांगलादेशचे फलंदाज पहिल्या डावात भारतीय गोलंदाजांसमोर टिकू शकले नाहीत आणि अवघ्या 149 धावांवर सर्वबाद झाले. पहिल्या डावाच्या जोरावर टीम इंडियाला 227 धावांची आघाडी मिळाली. टीम इंडियाने आता दुसऱ्या डावात 3 विकेट गमावून 81 धावा केल्या आहेत.
दरम्यान, यशस्वी जैस्वालने बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात 56 आणि 10 धावांची खेळी केली आणि सामन्यात एकूण 66 धावा केल्या. यासह तो त्याच्या कारकिर्दीतील पहिल्या 10 कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय खेळाडू बनला आहे. वयाच्या 22 व्या वर्षी यशस्वीने सुनील गावस्कर यांचा 51 वर्ष जुना विक्रम मोडला आहे. याआधी, भारतासाठी कारकिर्दीतील पहिल्या 10 कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम गावसकर यांच्या नावावर होता.
सुनील गावस्कर यांनी 1973 साली पहिल्या 10 कसोटी सामन्यात 978 धावा केल्या होत्या. तर जैस्वालने आतापर्यंत कारकिर्दीतील पहिल्या 10 कसोटी सामन्यांमध्ये 1 हजार 094 धावांचा टप्पा गाठला असून तो गावस्करच्या पुढे गेला आहे.
पहिल्या 10 कसोटीनंतर सर्वाधिक धावा करणारे फलंदाज….
1446 – डॉन ब्रॅडमन (ऑस्ट्रेलिया)
1125 – एव्हर्टन वीक्स (वेस्ट इंडीज)
1102 – जॉर्ज हॅडली (वेस्ट इंडिज)
1094 – यशस्वी जैस्वाल (भारत)
1088 – मार्क टेलर (ऑस्ट्रेलिया)
Ind vs Ban 1st Test : चेन्नई कसोटीत बुमराहची कमाल, 4 विकेटसह आणखी एका विक्रमाला घातली गवसणी…
जैस्वालने कसोटी क्रिकेटमध्ये दोन झळकावली आहेत द्विशतके…
यशस्वी जैस्वालने 2023 साली भारतीय संघात पदार्पण केले. त्यानंतर त्याने 10 कसोटी सामन्यांमध्ये 1094 धावा केल्या आहेत ज्यात तीन शतकांचा समावेश आहे. जैस्वालने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत दमदार कामगिरी करत द्विशतकासह 712 धावा केल्या होत्या. त्यावेळी त्याने एकट्याने टीम इंडियाला विजयापर्यंत नेले होते. याव्यतिरिक्त त्याने टीम इंडियासाठी 23 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एकूण 723 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याच्या नावावर एक शतक आणि पाच अर्धशतके आहेत.