Yami Gautam : बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमने गेल्या काही वर्षांत निवडक पण दर्जेदार चित्रपट दिले आहेत. तिच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक होत असून, तिचे चित्रपट बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई करत आहेत. या यशाच्या जोरावर यामी आता थोडा वेगळा आणि हलका-फुलका प्रयोग करण्याच्या तयारीत आहे. ‘हक’नंतर आता ती हॉरर-कॉमेडी चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यामी याआधी अर्जुन कपूर आणि सैफ अली खान यांच्या ‘भूत पोलिस’ या चित्रपटात दिसली होती, मात्र त्यात तिची भूमिका दुय्यम होती. आता मात्र ती ‘नवी नवेली’ या हॉरर-कॉमेडी चित्रपटातून लीड रोलमध्ये प्रेक्षकांसमोर येणार आहे. मिथॉलॉजीशी जोडलेली वेगळी कथा ‘नवी नवेली’ या चित्रपटाची खास बाब म्हणजे त्याची कथा भारतीय पुराणकथांशी जोडलेली आहे. सध्या प्रेक्षकांना हॉरर-कॉमेडी प्रकार खूप आवडतो आहे. याआधी श्रद्धा कपूरची ‘स्त्री २’ आणि शर्वरी वाघची ‘मुंज्या’ या चित्रपटांनी मोठी कमाई केली आहे. त्यामुळे यामी गौतमचाही हा प्रयोग चर्चेत आहे. शूटिंग कधी सुरू होणार? या चित्रपटाची कथा दिव्य निधी शर्मा यांनी लिहिली आहे. त्यांनी याआधी ‘सितारे जमीन पर’, ‘लापता लेडीज’ आणि ‘हीरामंडी’सारख्या यशस्वी प्रोजेक्ट्सवर काम केलं आहे. चित्रपटाचे निर्माते आनंद एल राय असून, यामी त्यांच्यासोबत याआधी ‘नखरेवाली’ चित्रपटात काम करत होती (जो अजून प्रदर्शित झालेला नाही). रिपोर्ट्सनुसार, ‘नवी नवेली’चं शूटिंग फेब्रुवारी २०२६पासून सुरू होण्याची शक्यता आहे. यामी गौतमच्या अभिनयाची झलक यामीच्या अभिनयाची झलक तिच्या मागील चित्रपटांतून दिसून आली आहे. ओटीटीवरील ‘अ थर्सडे’ला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. ‘आर्टिकल ३७०’, ‘चोर निकलकर भागा’ आणि ‘ओएमजी २’मध्येही तिच्या कामाचं कौतुक झालं. ‘आर्टिकल ३७०’ आणि ‘ओएमजी २’ने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाईही केली. ‘हक’नंतर आता ‘नवी नवेली’मधून यामी काय कमाल करते, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.