Vikram Kakade : आमदार विक्रम काकडे पुन्हा नेमबाजीच्या मैदानात; थेट राष्ट्रीय स्पर्धेत उतरणार!
Vikram Kakade : नोव्हेंबरमध्ये दिल्लीत होणाऱ्या राष्ट्रीय नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेसाठी सरावाला सुरुवात

Vikram Kakade : महाराष्ट्र विधान परिषदेचे आमदार विक्रम काकडे पुन्हा एकदा नेमबाजीच्या मैदानात उतरणार आहेत. नोव्हेंबरमध्ये नवी दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत ते सहभागी होणार असून, त्यासाठी त्यांनी सराव सुरू केला आहे.
नेमबाजी हा काकडे यांचा जुना आणि आवडीचा खेळ आहे. यापूर्वी ते नियमितपणे या खेळाचा सराव करत होते. मात्र सार्वजनिक जीवनातील विविध जबाबदाऱ्यांमुळे काही काळ त्यांना नेमबाजीपासून दूर राहावे लागले. आता त्यांनी पुन्हा सरावाला सुरुवात केली आहे.
नुकतीच काकडे यांनी टेंभुर्णी येथे माजी आमदार संजय मामा शिंदे यांचे पुत्र आणि राष्ट्रीय स्तरावरील नेमबाज यशवंत शिंदे यांच्या ट्रॅप आणि स्कीट नेमबाजी केंद्राला भेट दिली. यावेळी संजय मामा शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले. काकडे यांनी याठिकाणी नेमबाजीचा सरावही केला.
“नेमबाजी हा माझ्यासाठी केवळ खेळ नाही, तर अनेक वर्षांपासून जपलेली आवड आहे. काही काळ या खेळापासून दूर होतो. आता पुन्हा सराव सुरू केला आहे. नोव्हेंबरमध्ये दिल्लीत होणाऱ्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होणार आहे. सार्वजनिक जीवनातील जबाबदाऱ्या सांभाळतानाच माझी ही जुनी आवड जोपासण्याचा प्रयत्न आहे,” असे काकडे यांनी सांगितले.
राष्ट्रीय स्पर्धेच्या तयारीसाठी काकडे यांनी नियमित सराव सुरू केला असून, आगामी काळात सरावाचा कालावधी आणि तीव्रता वाढविण्यात येणार आहे.





