Yami Gautam: शाहबानो प्रकरणावर आधारित ‘हक्क’ चित्रपटामध्ये झळकणार यामी गौतम; ‘राष्ट्रवादी’ म्हणणाऱ्यांना दिले स्पष्ट उत्तर

Yami Gautam: शांत आणि ठाम भूमिकांसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री यामी गौतम लवकरच आपल्या पुढील चित्रपट ‘हक्क’ मध्ये झळकणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता इमरान हाश्मीही मुख्य भूमिकेत आहे. ऐतिहासिक शाह बानो प्रकरणावर आधारित या चित्रपटात न्याय, ओळख आणि श्रद्धा या विषयांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. अलीकडेच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, त्याच्या लाँच कार्यक्रमात यामीने आपल्या निवडलेल्या भूमिकांवर आणि ‘राष्ट्रवादी’ या टॅगवर प्रतिक्रिया दिली.
‘राष्ट्रवादी’ टॅगवर यामीचा स्पष्ट प्रतिसाद
ट्रेलर लाँचवेळी यामीला विचारण्यात आलं की, अलीकडील काळात तिने ज्या प्रकारच्या चित्रपटांची निवड केली आहे, त्यामुळे तिला वारंवार ‘राष्ट्रवादी अभिनेत्री’ असा टॅग दिला जातो. या प्रश्नावर ती हसली आणि म्हणाली,
“हा काही लेबल आहे का? मला माहितीच नाही. लोकांचं काम असतं काही ना काही बोलणं. हे नाही तर काहीतरी दुसरं, आणि त्यानंतर पुन्हा काहीतरी नवीन लेबल. पूर्वी मला ‘अंडररेटेड अभिनेत्री’ म्हटलं जायचं. त्याआधी काहीतरी वेगळं. हे सगळं बदलत राहातं. मी अशा लेबल्सकडे फारसं लक्ष देत नाही.”
View this post on Instagram
‘हक्क’मधील भूमिकेबद्दल यामीचे विचार
यामीने सांगितले की ‘हक्क’ तिच्यासाठी फक्त एक कोर्टरूम ड्रामा नाही. ती म्हणाली,
“या चित्रपटाचा विषय हा सार्वजनिक जीवनात बराच चर्चेत राहिला आहे. मला नेहमी वाटतं शाजियासारख्या महिलेने त्या काळात किती ताकद आणि धैर्य दाखवलं असेल! अशा महिलांच्या कथा सांगण्याची संधी मला मिळाली, तर मी नक्की सांगणार.”
चित्रपटाची कहाणी आणि प्रदर्शनाची तारीख
सुपर्ण वर्मा दिग्दर्शित ‘हक्क’ हा चित्रपट ७ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. शाह बानो प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आधारित हा चित्रपट वैयक्तिक कायदे, लैंगिक समानता आणि न्याय या सामाजिक मुद्द्यांवर विचार मांडतो.





