WTT Contender Lagos 2024 : भारतीय टेबल टेनिसपटू ‘श्रीजा अकुला’चे ऐतिहासिक सुवर्णपदक…

WTT Contender Lagos 2024 (Table Tennis) : पुढील महिन्यात होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी भारताची महिला टेबल टेनिसपटू श्रीजा अकुला (Sreeja Akula) हिने चमकदार कामगिरी करत इतिहास रचला. डब्ल्यूटीटी कंटेंडर (WTT Contender Lagos 2024) स्पर्धेत एकेरीचे विजेतेपद पटकावणारी श्रीजा ही पहिली भारतीय खेळाडू ठरली. पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या श्रीजाने अंतिम फेरीत चीनच्या डिंग यिजीचा 4-1 असा पराभव केला. श्रीजाने या स्पर्धेत एकूण दोन सुवर्णपदके जिंकली.
महिला एकेरीच्या फायनलमध्ये अकुलाची सुरुवात खराब झाली कारण चिनी प्रतिस्पर्ध्याविरूध्द तिने पहिलाच गेम 10-12 ने गमावला. पण तिने जोरदार पुनरागमन करत पुढचे चार गेम 11-9, 11-6, 11-8, 11-6 असे जिंकून सुवर्णपदक जिंकले.
महिला दुहेरीतही जिंकले सुवर्णपदक…
श्रीजाने अर्चना कामथसह महिला दुहेरी प्रकारात देशबांधव दिया चितळे आणि यशस्विनी घोरपडे यांचा 3-0 (11-9, 11-6, 12-10) असा पराभव करून दुसरे सुवर्ण जिंकले.
Update: WTT Contender Lagos☑️#TableTennis🏓
Our talented paddlers clinched a total of 9⃣medals including 3 🥇 1 🥈 5 🥉
Take a look at the medallists and their respective categories:
Women’s Singles:-
1) Sreeja Akula:- 🥇
2) Sutirtha Mukherjee:- 🥉
3) Ayhika Mukherjee:-… pic.twitter.com/eQSyHiUqwk— SAI Media (@Media_SAI) June 23, 2024
पुरुष दुहेरी प्रकारातही भारताने सुवर्णपदक पटकावले. हरमीत देसाई-मानव ठक्कर या भारतीय जोडीने अझीझ सोळंके-ओलाजीदे ओमोटायो या नायजेरियन जोडीचा 3-0 (11-8-11-9, 11-8) असा पराभव केला. अशा प्रकारे भारताने तीन सुवर्ण आणि एक रौप्य पदकासह स्पर्धेतील आपल्या मोहिमेचा शेवट केला. यासह चारही विजेतेपद पटकावणाऱ्या भारतीय टेबल टेनिसपटूंमध्ये श्रीजा अकुला, अर्चना कामथ, हरमीत देसाई आणि मानव ठक्कर यांचा समावेश असून या सर्वांचा पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारतीय संघात समावेश आहे.





