Asian Games 2026 : पाकला एका क्षणात लोळवलं! भारतीय महिला टेबल टेनिस संघ दिमाखात क्वार्टर फायनलमध्ये
आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ च्या दुसऱ्या (Asian Games 2026) दिवशी भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरीचे प्रदर्शन घडवत देशवासीयांची मने जिंकली आहेत.

Asian Games 2026 : आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ च्या दुसऱ्या (Asian Games 2026) दिवशी भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरीचे प्रदर्शन घडवत देशवासीयांची मने जिंकली आहेत. नेमबाजीत अचूक वेध घेत पदक जिंकल्यानंतर क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले होते ते टेबल टेनिसच्या रणांगणाकडे.
भारत विरुद्ध पाकिस्तान असा हायव्होल्टेज सामना रंगला खरा, पण टेबल टेनिसच्या कोर्टवर भारतीय महिलांनी पाकिस्तानला एका क्षणाचीही उसंत न देता ३-० ने अक्षरशः धूळ चारली. या विजयासह भारताने दिमाखात क्वार्टर फायनलमध्ये धडक मारली आहे.
कोर्टवर पाकला टिकूच दिले नाही; सलग तीन विजयांसह क्लीन स्वीप
टेबल टेनिसमध्ये बेस्ट ऑफ ५ च्या नियमानुसार विजेत्याची निवड होते. पाचपैकी तीन सामने (Asian Games 2026) जिंकणाऱ्या संघाचे पारडे जड ठरते, मात्र भारताने पाकिस्तानला सावरण्याची अजिबात संधी दिली नाही.
सामन्याच्या सुरुवातीलाच सुतीर्था मुखर्जीने वादळी खेळ दाखवत केवळ १० मिनिटांच्या आत पाकिस्तानच्या अलीना खानचा ११-३, ११-३, ११-४ अशा एकतर्फी फरकाने फडशा पाडला. त्यानंतर दुसऱ्या गेममध्ये सिंड्रेला दासने कालसूम खानवर पूर्णपणे वर्चस्व गाजवत ११-६, ११-७, ११-५ अशा सरळ सेट्समध्ये विजय मिळवून भारताला २-० ची आघाडी मिळवून दिली.
तिसऱ्या निर्णायक सामन्यात भारताची युवा स्टार श्रीजा अकुला मैदानात उतरली. श्रीजाने फातिमा खानला ११-४, ११-४, ११-५ अशा फरकाने लोळवून पाकिस्तानचे आव्हान पूर्णपणे संपवले. भारताने पहिले तीनही सामने जिंकल्यामुळे उर्वरित दोन सामन्यांची गरजच भासली नाही.
२०२२ ची कटू आठवण पुसली, ग्रुप एफ मध्ये भारतीय संघ ठरला अजिंक्य
२०२२ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत (Asian Games 2026) भारताच्या महिला संघाला ‘राऊंड ऑफ १६’ मधूनच बाहेर पडावे लागले होते. पण यावेळी भारतीय मुली वेगळ्याच इराद्याने मैदानात उतरल्या होत्या. ग्रुप एफ मध्ये त्यांनी तिन्ही सामने जिंकून संपूर्ण वर्चस्व राखले.
पहिल्या सामन्यात इंडोनेशियाला ३-० असे नमवल्यानंतर सिंगापूरच्या कडव्या आव्हानावर ३-२ अशी मात केली, तर पाकिस्तानचा ३-० असा धुव्वा उडवत भारताने थेट क्वार्टरफायनलमध्ये धडक मारली.
नेमबाजीत पदकांची हॅटट्रिक, पुरुषांच्या संघाने जिंकले रौप्यपदक
दुसऱ्या दिवशी नेमबाजांनीही पदकांचे खाते सुरूच ठेवले. पुरुषांच्या १० मीटर एअर रायफल टीम इव्हेंटमध्ये भारतीय संघाने चमकदार कामगिरी करत रौप्यपदक पटकावले. या स्पर्धेत भारताला आतापर्यंत मिळालेली सर्व तीनही पदके नेमबाजीतूनच आली आहेत.






