WPL 2027 Auction : लिलावाची तारीख अन् ठिकाण अखेर ठरले! २८ सप्टेंबरआधी फ्रँचायझींना घ्यावा लागणार मोठा निर्णय
WPL 2027 Auction : महिला प्रीमियर लीगच्या पुढील हंगामाच्या लिलावासंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. डब्ल्यूपीएलचा लिलाव पुढील महिन्यात होणार आहे. लिलाव कोणत्या शहरात होणार आहे, हे देखील उघड झाले आहे.

WPL 2027 Auction Date Announced Kochi October 28 Retention Deadline 28 September : महिला प्रीमियर लीगच्या (WPL) आगामी पाचव्या हंगामाच्या तयारीला वेग आला असून खेळाडूंच्या रिटेंशन, रिलीज आणि लिलावाचे (Auction) चित्र आता स्पष्ट झाले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) १६ सप्टेंबर रोजी सर्व पाचही फ्रँचायझींना अधिकृत माहिती पाठवून २८ ऑक्टोबर रोजी कोची येथे लिलाव होणार असल्याचे जाहीर केले आहे. याशिवाय, सर्व फ्रँचायझींना आपल्या संघात कायम ठेवण्यात येणाऱ्या (Retained) आणि संघातून वगळण्यात येणाऱ्या (Released) खेळाडूंची अंतिम यादी सादर करण्यासाठी २८ सप्टेंबरची अंतिम मुदत (Deadline) देण्यात आली आहे.
१५ कोटींची पर्स अन् १८ खेळाडूंची मर्यादा; फ्रँचायझींची रणनीती ठरणार महत्त्वाची!
डब्लूपीएलच्या नियमांनुसार एका संघात कमाल १८ खेळाडूंचा समावेश असू शकतो, ज्यामध्ये जास्तीत जास्त ६ परदेशी खेळाडूंना स्थान देण्याची परवानगी आहे. आगामी हंगामासाठी प्रत्येक फ्रँचायझीची सॅलरी पर्स १५ कोटी रुपये निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे लिलावात अधिक रकमेसह उतरण्यासाठी आणि संघाची ताकद वाढवण्यासाठी फ्रँचायझी कोणत्या बड्या खेळाडूंना रिलीज करतात आणि कोणावर विश्वास कायम ठेवतात, याकडे क्रीडाविश्वाचे लक्ष लागले आहे.
वाराणसीचे यजमानपद हुकणार; मुंबई आणि वडोदरा येथे रंगणार सामने!
🚨 News 🚨 #TATAWPL 2027 to be played from 14 January to 7 February 2027 🗓️
Player Auction to be held on 28 October 2026 in Kochi 📍
More details ▶️ https://t.co/tuEXkaaY6T pic.twitter.com/mjLcSOJawp
— Women’s Premier League (WPL) (@wplt20) September 16, 2026
पुढील हंगामाच्या सामन्यांसाठी वाराणसीच्या नव्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमची चर्चा सुरू होती; मात्र स्टेडियमच्या अपूर्ण तयारीमुळे तेथे सामने होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. त्यामुळे गत हंगामाप्रमाणेच आगामी सीझनचे सामने मुंबईतील सीसीआय (CCI) आणि वडोदरा येथील कोटांबी स्टेडियमवर खेळवले जातील. स्पर्धा दरवर्षीप्रमाणे जानेवारी ते फेब्रुवारी २०२७ दरम्यान आयोजित केली जाण्याची दाट शक्यता आहे.
आरसीबी डिफेंडिंग चॅम्पियन; कोचीच्या लिलावात रंगणार चुरस!
गतविजेता संघ म्हणून मैदानात उतरणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसह (RCB) मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, गुजरात जायंट्स आणि यूपी वॉरियर्स या पाचही संघांमध्ये २८ ऑक्टोबरच्या लिलावात जोरदार चुरस पाहायला मिळेल. नव्या गुणवान खेळाडूंना आपल्या ताफ्यात सामील करून जेतेपदावर नाव कोरण्यासाठी सर्व संघ आता २८ सप्टेंबरच्या रिटेंशनच्या गणितावर अंतिम हात फिरवत आहेत.





