Gautam Gambhir Statement : “माझे काम लोकांना खूश करणे नाही…”, वैभव सूर्यवंशीला वगळल्याने होणाऱ्या टीकेवर गौतम गंभीरचे सडेतोड प्रत्युत्तर
Gautam Gambhir Statement : इशान किशन दुखापतग्रस्त असताना वैभवला दोन सामन्यांत संधी मिळाली होती; मात्र इशान तंदुरुस्त होऊन परतताच वैभवला पुन्हा थेट बेंचवर बसवण्यात आले. यावर गौतम गंभीरने प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे.

Gautam Gambhir Breaks Silence On Dropping Vaibhav Sooryavanshi In 5th T20I : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेदरम्यान १५ वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याच्या निवडीवरून मोठा गदारोळ पाहायला मिळाला. इशान किशन दुखापतग्रस्त असताना वैभवला दोन सामन्यांत संधी मिळाली होती; मात्र इशान तंदुरुस्त होऊन परतताच वैभवला पुन्हा थेट बेंचवर बसवण्यात आले. पाचव्या सामन्यातही त्याला संधी न दिल्याने सोशल मीडियावर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यावर जोरदार टीका झाली. या सर्व वादावर आता गंभीरने मौन सोडत टीकाकारांना रोखठोक प्रत्युत्तर दिले आहे.
पाचव्या सामन्यात दोन बदल, तरीही वैभव बाकावरच –
पाचव्या टी-२० लढतीसाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन महत्त्वाचे बदल करण्यात आले होते. अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि फिरकीपटू वरुण चक्रवर्ती यांचा संघात समावेश करण्यात आला; मात्र तरीही वैभव सूर्यवंशीला पुन्हा बाकावरच ठेवण्यात आले. अवघ्या १९ चेंडूंत ४५ धावांची वादळी खेळी करणाऱ्या वैभवला मालिका जिंकल्यानंतरही संधी न दिल्यामुळे क्रिकेट चाहत्यांनी आणि अनेक माजी खेळाडूंनी गंभीरच्या रणनीतीवर जाहीर नाराजी व्यक्त केली होती. आता यावर गौतम गंभीरने प्रतिक्रिया दिली आहे.
‘माझे काम प्रत्येकाला खूश करणे नाही’; गंभीरचा सडेतोड पवित्रा
सामना सुरू होण्यापूर्वी झालेल्या चर्चेत गंभीरने थेट शब्दांत भूमिका स्पष्ट केली. तो म्हणाला, “माझे काम लोकांना खूश करणे नाही. माझी खरी जबाबदारी संघाच्या हिताचे योग्य निर्णय घेणे ही आहे, लोकांना आवडतील असे निर्णय घेणे नाही. मी याच कामासाठी इथे बसलो आहे. आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियावरील चर्चा आणि बाहेरील गोष्टींचा संघावर खूप मोठा प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केला जातो, पण मी त्याला बळी पडणार नाही.”
GAUTAM GAMBHIR ON HIS JOB. 🗣️
“First of all my job is not to make everyone happy. My job is to take the right decisions, not the popular decisions. And that is what I’m there for. Guys who have done phenomenally well over a longer period of time. Obviously deserves a longer rope. And that is exactly how we approach the series”.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 1, 2026
‘अनुभवी खेळाडूंना पाठिंबा देणे महत्त्वाचे’ –
आपल्या भूमिकेचे समर्थन करताना गंभीर पुढे म्हणाला, “लोकांना जे आवडेल ते करणे खूप सोपे असते, पण योग्य आणि कठोर निर्णय घेणे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचे आहे. ड्रेसिंग रूममधील खेळाडूंना सुरक्षा आणि पूर्ण पाठिंबा मिळणे गरजेचे असते. संघात अनेक गुणवान खेळाडू आहेत, पण काही असेही खेळाडू आहेत ज्यांनी गेल्या काही वर्षांत सातत्याने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. अशा खेळाडूंना स्वतःला सिद्ध करण्याची पुरेशी संधी मिळाली पाहिजे आणि याच विचाराने आम्ही निर्णय घेतले आहेत.”
पाचव्या सामन्यात न्यूझीलंडने मारली बाजी –
पाचव्या टी-२० सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने इशान-श्रेयस यांच्या अर्धशतकांच्या जोरावर ८ बाद १९१ धावांची आव्हानात्मक धावसंख्या उभारली होती. मात्र, प्रत्युत्तरात यजमान न्यूझीलंड संघाने टिम सेफर्टच्या ९३ धावांच्या आणि ग्लेन फिलिफ्सच्या नाबाद ६५ धावांच्या जोरावर १८ व्या षटकातच विजयाची नोंद केली. अशा प्रकारे न्यूझीलंडने सलग दोन सामने जिंकले असले, तरी भारताने आधीच तीन सामने जिंकून मालिका खिशात घातली आहे.





