WPL 2024 Auction : डब्लूपीएलचा आज लिलाव; ‘या’ खेळाडूला मिळू शकते सर्वाधिक किंमत…

मुंबई – महिला प्रीमियर लीग 2024 साठी मिनी लिलाव शनिवारी (9 डिसेंबर) मुंबईत होणार आहे. लिलावात एकूण १७.६५ कोटी रुपये पाच फ्रँचायझींकडे ३० स्लॉटसाठी उपलब्ध आहेत.
महिला प्रीमियर लीगच्या मिनी लिलावात ऑस्ट्रेलियाची किम गर्थ ही सर्वात महागडी खेळाडू बनू शकते. तिची मूळ किंमत ५० लाख रुपये आहे. या २७ वर्षीय अष्टपैलू खेळाडूने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २३ च्या सरासरीने ७६४ धावा केल्या आहेत आणि २० च्या सरासरीने ४५ बळी घेतले आहेत.
वेस्ट इंडिजची ३२ वर्षीय डिआंड्रा डॉटिन हिच्यावरही चांगली बोली लागू शकते. ५० लाख मुळ किंमत असलेल्या डॉटिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २५ च्या सरासरीने २,६९७ धावा केल्या आहेत.
ऑस्ट्रेलियन अष्टपैलू अॅनाबेल सदरलँड तिच्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखली जाते. या २२ वर्षीय खेळाडूने आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये १४४ च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. यासह ऑस्ट्रेलियन गोलंदाज जॉर्जिया वेअरहॅम, इंग्लंडची यष्टिरक्षक फलंदाज अॅमी जोन्स, दक्षिण आफ्रिकेची ३५ वर्षीय वेगवान गोलंदाज शबनीम इस्माईलवरही मोठ्या प्रमाणावर पैशांचा वर्षाव होऊ शकतो.





