Legends League 2023 Final : हरभजन आणि सुरेश रैनाचे संघ आमनेसामने, जाणून घ्या; फायनलपूर्वी काय म्हणाले दोन्ही कर्णधार…

Legends League Cricket 2023 : गेल्या 20 दिवसांपासून सुरू असलेली लिजेंड्स लीग क्रिकेट आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. ग्रुप स्टेज आणि प्लेऑफ सामन्यांनंतर आता अंतिम सामन्याची पाळी आहे. या सामन्यात मणिपाल टायगर्स आणि अर्बनायझर्स हैदराबाद आमनेसामने असतील. मणिपालचे नेतृत्व माजी भारतीय फिरकीपटू हरभजन सिंगकडे आहे, तर हैदराबादचे नेतृत्व सुरेश रैनाकडे आहे. या अंतिम सामन्यापूर्वी दोन्ही कर्णधारांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले.
सुरेश रैना म्हणाला, ‘आम्ही खेळलेल्या सर्व क्रिकेटप्रमाणेच लेजेंड्स लीग क्रिकेटही स्पर्धात्मक राहिले आहे. अंतिम फेरीतही आम्हाला तितक्याच चांगल्या क्रिकेटची अपेक्षा आहे. आम्ही दोघे (हरभजन आणि मी) एकत्र आणि एकमेकांविरुद्ध अनेक फायनल खेळलो आहोत आणि मला माहित आहे की हा अनुभव इतर फायनलप्रमाणेच चांगला असेल.
हरभजन सिंग म्हणाला, ‘फायनलपर्यंतचा हा प्रवास खूप चांगला होता. लेजेंड्स लीग क्रिकेट हा खूप मजेदार अनुभव आहे आणि या स्पर्धेत चांगले स्पर्धात्मक क्रिकेट पहायला मिळाले. रांची, डेहराडून, जम्मू, विशाखापट्टणम आणि आता सूरतसह विविध शहरांमध्ये या लीगचे सामने आयोजित केल्याने या शहरांमध्ये खेळांना प्रोत्साहन मिळेल. या शहरांमध्ये साधारणपणे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे फारसे सामने होताना दिसत नाहीत. आम्ही या सर्व ठिकाणी सामने खेळलो आणि आम्हाला सर्व ठिकाणी चांगला प्रतिसाद पहायला मिळाला.
अंतिम सामना कधी आणि कुठे होणार?
मणिपाल टायगर्स आणि अर्बनायझर्स हैदराबाद यांच्यातील हा अंतिम सामना सुरतच्या लालभाई कॉन्ट्रॅक्टर स्टेडियमवर होणार आहे. हा सामना 9 डिसेंबर रोजी संध्याकाळी 6.30 वाजता सुरू होईल.
कोणते खेळाडू दिसणार?
हरभजन आणि सुरेश रैना यांच्यासह मोहम्मद कैफ, प्रवीण कुमार, मार्टिन गुप्टिल आणि असगर अफगाण अशी अनेक मोठी नावे या सामन्यात भाग घेणार आहेत.
फायनलपर्यंतचा दोन्ही संघांचा प्रवास कसा होता?
या लीगमध्ये सहा संघ सहभागी झाले होते. सर्वप्रथम पाच संघांमध्ये राऊंड रॉबिनचे सामने खेळवण्यात आले. येथे प्रत्येक संघ इतर पाच संघांसह प्रत्येकी एक सामना खेळला. या टप्प्यातील टॉप-4 संघ प्लेऑफमध्ये पोहोचले. प्लेऑफ सामन्यांमध्ये मणिपाल टायगर्स आणि अर्बनायझर्स हैदराबाद यांनी विरोधी संघांना पराभूत करून अंतिम फेरीत धडक मारली आहे.





