वुहान : जगभरात करोनाचे संकट कायम असून सर्वच देश करोनाशी लढा देत आहे. त्यातच चीनमध्ये पुन्हा एकदा करोना संसर्गाच्या प्रकरणांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. चीनमध्ये 13,146 करोनाबाधितांची नोंद झाली आहे. ही जवळजवळ दोन वर्षांपूर्वी पहिल्या लाटेच्या शिखरानंतरची सर्वाधिक करोनाबाधितांची नोंद आहे. शांघायमध्ये एकाच दिवसात विक्रमी 8226 रुग्ण आढळले आहेत. राष्ट्रीय आरोग्य आयोगाने ही माहिती दिली आहे.
चीनमध्ये करोनाच्या ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग पुन्हा एकदा झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, राष्ट्रीय आरोग्य आयोगाच्या निवेदनात असे म्हटले आहे की, करोना संसर्गामुळे नवीन मृत्यूची नोंद झालेली नाही. तर शांघायमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे.
चीनमधील शांघाय शहरात करोनाचा वाढता संसर्ग पाहता लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. आज निर्बंध हटणार होते. मात्र आज पुन्हा एकदा लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. शांघायमधील लाखो लोक सुमारे दोन वर्षांनंतर अतिशय कडक लॉकडाऊनमध्येच आहेत.
28 मार्च रोजी चीनच्या सर्वात मोठ्या शहराने करोनाच्या ओमायक्रॉन प्रकाराच्या संसर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी दोन-चरणातील लॉकडाउन लागू केले होते. पूर्व शांघायसाठी सुरुवातीला पाच दिवसांच्या लॉकडाऊनची योजना आखण्यात आली होती. त्यानंतर शहराच्या पश्चिमेकडील जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त पाच दिवसांची बंदी घालण्यात आली होती.