Ishan Kishan Record : इशान किशनने रचला नवा इतिहास! पाकिस्तानविरुद्ध ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच भारतीय
Ishan Kishan Record : पाकिस्तानविरुद्धच्या हाय-व्होल्टेज सामन्यात इशानने केवळ चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत टी-२० विश्वचषकाच्या इतिहासातील पाकिस्तानविरुद्धचे सर्वात जलद अर्धशतक ठोकण्याचा पराक्रम केला आहे.

Ishan Kishan record fastest fifty against Pakistan T20 World Cup : टी-२० विश्वचषक २०२६ मधील सर्वात मोठ्या महामुकाबल्यात भारताच्या इशान किशनने आपल्या बॅटने मैदानात आग ओकली आहे. पाकिस्तानविरुद्धच्या हाय-व्होल्टेज सामन्यात इशानने केवळ चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत टी-२० विश्वचषकाच्या इतिहासातील पाकिस्तानविरुद्धचे सर्वात जलद अर्धशतक ठोकण्याचा पराक्रम केला आहे. इशानच्या या आक्रमक खेळीमुळे पाकिस्तानचे गोलंदाज पूर्णपणे हतबल झाल्याचे पाहायला मिळाले.
केवळ ‘इतक्या’ चेंडूत झळकावले अर्धशतक –
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाला इशान किशनने स्फोटक सुरुवात करून दिली. त्याने पाकिस्तानी वेगवान गोलंदाजांचा समाचार घेत मैदानाच्या चहूबाजूंना फटकेबाजी केली. इशानने आपले अर्धशतक अवघ्या २७ चेंडूत पूर्ण केले, ज्यामुळे तो पाकिस्तानविरुद्ध विश्वचषकात सर्वात वेगाने ५० धावा करणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे.
२७ – इशान किशन, कोलंबो (आरपीएस), २०२६*
२९ – युवराज सिंग, अहमदाबाद, २०१२
अनेक दिग्गजांना टाकले मागे –
या ऐतिहासिक खेळीसह इशान किशनने टी-२० विश्वचषकात अनेक दिग्गजांना मागे टाकले आहे. यापूर्वी पाकिस्तानविरुद्ध महत्त्वाची खेळी करणाऱ्या विराट कोहली आणि इतर खेळाडूंच्या नावावर असलेले विक्रम आता इशानच्या नावे झाले आहेत. इशानच्या या खेळीमुळे भारताला पॉवरप्लेमध्येच मोठी धावसंख्या उभारण्यास मदत झाली आहे.
मैदानावर ‘इशान’ नावाचा धुमाकूळ –
इशान किशनने ४० चेंडूंचा सामना करताना १० चौकार आणि ३ गगनचुंबी षटकार ठोकत ७७ धावांची खेळी साकारली. या खेळीदरम्यान त्याने विशेषतः शाहीन शाह आफ्रिदी आणि अबरार अहमद यांच्या षटकांत त्याने घेतलेला आक्रमक पवित्रा प्रेक्षकांसाठी मेजवानी ठरला. कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियममधील प्रेक्षक इशानच्या प्रत्येक फटक्यावर जल्लोष करताना दिसत होते. तो बाद झाला तेव्हा भारतीय संघाने ८.४ षटकांत ८८ धावां केल्या होत्या.






