World Cup 2023 Semifinal #INDvNZ : सेमीफायनलपूर्वी कॉनवेचं मोठ विधान; म्हणाला “भारतीय संघ बलाढ्य असला तरीही..”

मुंबई – विश्वचषक 2023 चा पहिला उपांत्य सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. जगभरातील करोडो चाहते या सामन्याची वाट पाहत आहेत. या सामन्याशी भारतीय चाहत्यांचे भावनिक नाते आहे, कारण 2019 च्या विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे यावेळी टीम इंडिया न्यूझीलंडला हरवून त्या पराभवाचा बदला घेईल, अशी आशा चाहत्यांना आहे.
भारतीय संघाने एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत सलग नऊ विजय प्राप्त करत थाटात उपांत्य फेरी गाठली आहे. मात्र,भारतीय संघ बलाढ्य असला तरीही आम्हाला विजयाचा विश्वास आहे, असे
न्यूझीलंडचा फलंदाज डेव्हन कॉनवेने म्हटले आहे.
साखळी लढतीत आम्ही भारतीय संघाकडून पराभूत झालो होतो मात्र, तो आता भूतकाळ झाला आहे. आम्ही पराभवाने निराशा न होता उपांत्य सामन्यात उतरणार आहोत. घरच्या मैदानावर खेळण्याचा लाभ भारतीय संघाला मिळणार असला तरीही याच घरच्या प्रेक्षकांचे अतिरीक्त दडपणही त्यांनाच हाताळायचे आहे.
आम्ही याच गोष्टीवर लक्ष केंद्रित करत असून भारताच्या पहिल्या चार फलंदाजांवर दडपण ठेवायचे व नंतर त्यांच्या गोलंदाजीवर आक्रमण करायचे अशी आम्ही योजना यशस्वी करुन दाखवू.भारतीय संघ आतापर्यंत झालेल्या लढतीत अपराजीत आहे मात्र, आम्ही त्यांची ही विजयी वाटचाल खंडीत करु, असेही कॉनवे म्हणाला.
दरम्यान, गेल्या 20 वर्षांच्या आयसीसी टूर्नामेंटमध्ये न्यूझीलंड संघाने टीम इंडियावर वर्चस्व गाजवले आहे, परंतु यावेळी टीम इंडिया उपांत्य फेरीच्या सामन्यात न्यूझीलंडला पराभूत करू शकते. कारण सध्या टीम इंडिया जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. टीम इंडियाने विश्वचषकाच्या साखळी टप्प्यातील 8 सामने जवळपास एकतर्फी जिंकले आहेत. या विश्वचषकात भारताने सर्व 9 संघांचा पराभव केला आहे.





