New Zealand Record : भारताच्या भूमीवर न्यूझीलंडचा नवा वर्ल्ड रेकॉर्ड! सायफर्ट-कॉनवेने गोलंदाजांना धुतलं
New Zealand Record : भारताच्या भूमीवर कोणत्याही संघाने टीम इंडियाविरुद्ध केलेली ही सर्वात वेगवान शतकी कामगिरी ठरली आहे.

New Zealand Record 100 runs against India : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील चौथ्या सामन्यात न्यूझीलंडच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजीच्या अक्षरशः चिंधड्या उडवल्या. एसीए-व्हीडीसीए (ACA-VDCA) स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात न्यूझीलंडने टी-२० क्रिकेटमधील अनेक मोठे विक्रम मोडीत काढले आहेत. भारताच्या भूमीवर कोणत्याही संघाने टीम इंडियाविरुद्ध केलेली ही सर्वात वेगवान शतकी कामगिरी ठरली आहे.
८.१ ओव्हरमध्येच १०० धावा पूर्ण!
न्यूझीलंडच्या सलामीवीरांनी वादळी सुरुवात करत अवघ्या ८.१ षटकांत संघाचे शतक फलकावर लावले. भारताविरुद्ध टी-२० फॉरमॅटमधील हे संयुक्तपणे दुसरे सर्वात वेगवान शतक आहे. ज्यामध्ये टिम सायफर्टने ३६ चेंडूत ७ चौकार आणि ३ षटकारांसह ६२ धावांची स्फोटक खेळी. त्याचबरोबर डेव्हॉन कॉनवे २३ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ४४ धावा कुटल्या. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी १०० धावांची भागीदारी केली. ऑक्टोबर २०२२ नंतर प्रथमच न्यूझीलंडच्या सलामी जोडीला १०० धावांचा टप्पा ओलांडता आला आहे.
भारतासमोर विशाल आव्हान; न्यूझीलंडचा २१५ धावांचा डोंगर –
न्यूझीलंडचा भारताविरुद्ध सर्वात जलद १०० धावांचा विक्रम
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने २० षटकांत ७ बाद २१५ धावांचा विशाल स्कोर उभा केला. भारताविरुद्ध न्यूझीलंडची ही टी-२० मधील दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे. यापूर्वी २०१९ मध्ये वेलिंग्टन येथे २१९ धावा केल्या होत्या. न्यूझीलंडकडून टिम सायफर्टने (६२) सर्वाधिक धावांची खेळी साकारली. डेव्हॉन कॉनवे (४४), डेरिल मिचेल (३९) आणि ग्लेन फिलिप्स (२४) यांनी देखील योगदान दिले. भारताकडून अर्शदीप सिंग आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या, तर बुमराह आणि बिश्नोईला १-१ विकेट्स मिळाली.
विशाखापट्टणममध्ये नवा इतिहास घडणार?
भारताला हा सामना जिंकण्यासाठी २१६ धावांची गरज आहे. विशेष म्हणजे, या मैदानावर आतापर्यंत इतक्या मोठ्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग झालेला नाही. २०२५ मध्ये दिल्ली कॅपिटल्सने २१० धावांचे लक्ष्य गाठले होते, जो आतापर्यंतचा या मैदानावरील सर्वात मोठा धावांचा यशस्वी पाठलाग ठरला आहे. २०२३ मध्ये ऑस्ट्रेलियाने २०९ धावांचे लक्ष्य गाठले होते.





