World Cup 2023 : ‘पाकिस्तान जिंदाभाग!’ न्यूझीलंडच्या विजयानंतर सेहवाग असं का म्हणाला? बिर्याणीचीही करून दिली आठवण…

Virender Sehwag trolls Babar Azam’s team : विश्वचषक 2023 हळूहळू आपल्या समारोपाकडे वाटचाल करत आहे. भारत, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाचे संघ आधीच उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. चौथ्या स्थानासाठी न्यूझीलंडचा दावा सर्वात मजबूत असल्याचे दिसून येत आहे. त्याने गुरुवारी श्रीलंकेचा पाच विकेट्स राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने 46.4 षटकात 171 धावा केल्या आणि संघ सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात न्यूझीलंडने 23.2 षटकांत पाच गडी गमावून लक्ष्य गाठले. त्यामुळे किवी संघाचा निव्वळ धावगती आणखी चांगली झाली.
त्यामुळे उपांत्य फेरीत पोहचण्याची पाकिस्तान आणि अफगाणिस्तानची समीकरणे अत्यंत कठीण झाली आहेत. विशेषत: पाकिस्तानसाठी ते अवघड समीकरण साधणे फार कठीण आहे. बाबर आझमचा संघ या विश्वचषकातून जवळपास बाहेर पडल्याचे मानले जात आहे. यावरून चाहते पाकिस्तानी संघाला जोरदार ट्रोल करत आहेत. त्याचवेळी मुलतानचा सुलतान म्हणून प्रसिद्ध असलेला भारताचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागने पाकिस्तान संघाचा खरपूस समाचार घेतला आहे.
काय म्हणाला सेहवाग…?
सेहवागने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. त्यात बाय-बाय पाकिस्तान असे लिहिले आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये वीरूने लिहिले – पाकिस्तान जिंदाभाग! बस, जे होत ते इथंपर्यतच होतं. मला आशा आहे की तुम्हाला आमचा आदरातिथ्य आणि बिर्याणी आवडली असेल. तुम्हाला घरी परतण्यासाठी सुरक्षित उड्डाणासाठी शुभेच्छा. बाय-बाय पाकिस्तान! सेहवागच्या या पोस्टवर चाहते खूप एन्जॉय करताना दिसत आहेत.
बिर्याणीमुळे पाकिस्तान संघ चर्चेत…
खरंतर, पाकिस्तानचा संघ या वर्ल्ड कपमध्ये आपल्या खेळापेक्षा बिर्याणीमुळे जास्त चर्चेत राहिला आहे. जेव्हा-जेव्हा कॅप्टन बाबर आझम पत्रकार परिषदेत आला, तेव्हा त्याला भारतीय बिर्याणीबद्दल प्रश्न विचारण्यात आले. टीम हैदराबादमध्ये असताना तिथल्या बिर्याणीबाबत प्रश्न विचारण्यात आला. इतकंच नाही तर पाकिस्तानची टीम कोलकात्याला गेली तेव्हा त्यांनी तिथे ऑनलाइन बिर्याणी ऑर्डर केली होती. सलग काही सामने गमावल्यानंतर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू वसीम अक्रमने संघाच्या फिटनेसवर प्रश्न उपस्थित करत त्यांच्या आहारावरून संघावर निशाणा साधला होता. तो म्हणाला होता की, पाकिस्तानी खेळाडू प्रत्येकी आठ किलो मटण खात असल्याचे दिसते.
उपांत्यफेरी गाठण्यासाठी काय आहे पाकिस्तानचे समीकरण?
मात्र, पाकिस्तानचा संघ अद्याप विश्वचषकातून पूर्णपणे बाहेर पडलेला नाही. श्रीलंकेवरील विजयानंतर न्यूझीलंडचे नऊ सामन्यांतून 10 गुण झाले आहेत. त्याचा निव्वळ रन रेट +0.743 झाला आहे. त्याचबरोबर पाकिस्तान आठ सामन्यांत चार विजयांसह पाचव्या स्थानावर आहे. त्याचे आठ अंक आहेत. पाकिस्तानची निव्वळ धावगती +0.036 आहे. अफगाणिस्ताननेही आठपैकी चार सामने जिंकले आहेत. त्याच्या खात्यात आठ गुण आहेत. अफगाणिस्तानची निव्वळ धावगती -0.338 आहे. पाकिस्तान संघाने इंग्लंडविरुद्ध प्रथम फलंदाजी केल्यास त्यांना 287 किंवा त्याहून अधिक धावांच्या फरकाने सामना जिंकावा लागेल.
त्याचबरोबर पाकिस्तानला दुसऱ्या डावात फलंदाजीची संधी मिळाल्यास इंग्लंडने दिलेले कोणतेही लक्ष्य 16 चेंडूत गाठावे लागेल. अफगाणिस्तान संघाचा नेट रन रेट पाकिस्तान आणि न्यूझीलंडपेक्षा खूपच वाईट आहे. उपांत्य फेरी गाठायची असेल, तर प्रथम शुक्रवारी (10 नोव्हेंबर) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 438 धावांच्या फरकाने विजय मिळवावा लागेल. हे एक प्रकारचे अशक्य काम आहे.
उदाहरण :
1. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 300 धावा केल्या तर इंग्लंडला 13 धावांवर ऑलआउट करावे लागेल. या प्रकरणात पाकिस्तान 287 धावांनी विजयी होईल.
2. पाकिस्ताननं प्रथम फलंदाजी करताना 350 धावा केल्या तर इंग्लंडला 63 धावांवर बाद करावे लागेल. तेव्हा ते 287 धावांनी विजयी होतील.
3. पाकिस्तानने 400 धावा केल्या तर इंग्लंडला 112 धावांवर ऑलआउट करावे लागेल. तेव्हा पाक 288 धावांनी विजयी होईल.
पाकिस्तान संघाने नंतर फलंदाजी केल्यास जे काही लक्ष्य असेल ते 2.4 षटकांतच लक्ष्य गाठावे लागेल.






