D Gukesh Net Worth: चेस चॅम्पियनशिप जिंकताच गुकेशला बक्षीस स्वरुपात मिळाली तब्बल ‘एवढी’ रक्कम

World Chess Championship 2024 : FIDE वर्ल्ड चेस चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत भारताच्या डी गुकेशने गतविजेत्या डिंग लिरेनचा पराभव करत विजेतेपदावर आपले नाव कोरले आहे. या विजयासोबतच डी गुकेशने विक्रम केला आहे. वयाच्या अवघ्या 18व्या वर्षी विश्व चॅम्पियन बनवण्याची कामगिरी त्याने केली. याशिवाय, चेसमध्ये विश्वविजेता होण्यासोबतच गुकेश कोट्याधीश देखील झाला आहे. या स्पर्धेतील विजेत्या खेळाडूला मिळणारी रक्कम कोट्यावधी रुपये आहे.
बक्षिसाची रक्कम कोट्यावधी रुपये
या चेस चॅम्पियनशीप स्पर्धेची बक्षिसाची रक्कम तब्बल 2.5 मिलियन डॉलर (जवळपास 21 कोटी रुपये) आहे. या रक्कमेतील 11.45 कोटी रुपये गुकेशला मिळणार आहेत. तर उपविजेत्या लिरेनला 9.75 कोटी रुपये बक्षीस स्वरुपात दिले जातील.
तसेच, स्पर्धेतील प्रत्येक सामना जिंकल्यानंतर खेळाडूला 20 हजार डॉलर एवढी रक्कम दिली जाते. या स्पर्धेत गुकेशने तीन सामने जिंकले आहेत. त्यामुळे त्याला 60 हजार डॉलर एवढी रक्कम मिळाली.
वयाच्या 18व्या वर्षी चॅम्पियन
डी गुकेश हा गतविजेत्या लिरेनचा पराभव करत सर्वात तरूण चेस चॅम्पियन ठरला आहे. याआधी हा विक्रम रशियाच्या गॅरी कॅस्परोव यांच्या नावे होता. गॅरी यांनी 1985 मध्ये वयाच्या 22व्या वर्षी ही स्पर्धा जिंकली होती. याशिवाय, ही स्पर्धा जिंकणारा गुकेश हा केवळ दुसरा भारतीय आहे. याआधी 2012 मध्ये विश्वनाथ आनंद यांनी या स्पर्धेच्या विजेतेपदावर नाव कोरले होते.





