World Athletics Championships 2022 : नीरजला आणखी ‘एका’ विक्रमाची संधी

नवी दिल्ली – भारताचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू निरज चोप्रा आणखी एका विक्रमासाठी सज्ज बनला आहे. येत्या शुक्रवारपासून अमेरिकेतील ओरेगॉन प्रांतातील युजिन येथे जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धा होत आहे. त्यात नीरज आपले सर्वोत्तम अंतर नोंदवणार का याकडे तमाम क्रीडाप्रेमींचे लक्ष राहणार आहे.
सध्या अमेरिकेतच सरावाला असलेल्या नीरजची यंदा तीन स्पर्धांतील कामगिरी पाहता त्याला ही संधी निश्चितच आहे. नीरजच्या नावावर ज्युनिअर विश्वविजेतेपद, आशियायी, राष्ट्रकुल आणि ऑलिम्पिक स्पर्धेतील सुवर्णपदक आहे. आता केवळ जागतिक स्पर्धेतील सुवर्णपदक त्याने मिळवले तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व मानाच्या स्पर्धांमध्ये त्याचे यश अधोरेखित होणार आहे.
जागतिक स्पर्धेत भारताची लांब उडीतील खेळाडू अंजू जॉर्जने 2003 सालच्या पॅरिस स्पर्धेत ब्रॉंझपदक जिंकले होते. हे भारताचे एकमेव पदक ठरले होते. यामुळे जागतिक स्पर्धेत आतापर्यंत पदक जिंकणाऱ्या 102 देशांत भारत अन्य नऊ देशांसोबत संयुक्तपणे 93 व्या स्थानावर आहे.
या स्पर्धेत भारताचे 22 खेळाडू सहभागी होणार असून नीरजसह स्टीपलचेसमध्ये अविनाश साबळे, लांब उडीत मुरली श्रीशंकर, महिला भालाफेकीत अनू राणी यांच्याकडूनही सरस कामगिरीची अपेक्षा आहे.





