जागतिक मैदानी स्पर्धेत पदक मिळवणारी एकमेव क्रिकेटपटू कोण? जाणून घ्या…

ऑगस्ट २०२३ मध्ये झालेल्या जागतिक मैदानी स्पर्धेत भालाफेकीत भारताच्या २५ वर्षीय नीरज चोप्राने सुवर्णपदक मिळवले. या स्पर्धेतील आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे एका क्रिकेटपटूने देखील या मैदानी स्पर्धेत पदक मिळवलेले आहे.
ऑगस्ट २०२३ मध्ये झालेल्या जागतिक मैदानी स्पर्धेत पदक तक्त्यामध्ये भारत हा अठराव्या स्थानावर आला. भारताला मिळालेले एकमेव सुवर्णपदक म्हणजे भालाफेकपटू नीरज चोप्राने करून दाखवलेली कामगिरी. अर्थात भालाफेक आणि क्रिकेट यामध्ये एक रंजक असे साम्य आहे. ते म्हणजे इतिहासात एकमेव क्रिकेटपटू अशी आहे, की जिने जागतिक मैदानी स्पर्धेत पदक मिळवलेले आहे.
या महिला क्रिकेटपटूचे नाव सुनेत स्टेला विलिजोन-लव आहे. ६ ऑक्टोबर १९८३ रोजी दक्षिण अफ्रिकेतील रस्टेनबर्ग याठिकाणी तिचा जन्म झालेला आहे. तिने २०११ मध्ये दक्षिण कोरियातील दिग्वू येथे झालेल्या जागतिक मैदानी स्पर्धेत रौप्य पदक आणि २०१५ मध्ये बीजिंग येथे झालेल्या स्पर्धेत ब्रांझ पदक मिळवलेले आहे. रिओ येथे २०१६ मध्ये झालेल्या ऑलिंपिकमध्ये ही तिने भालाफेकीत रौप्य पदक प्राप्त केले आहे.
तिच्या क्रिकेटमधील करिअरचा विचार केला तर तिने एकमेव कसोटी सामना खेळला असून त्या सामन्यात देणे ८८ धावा केल्या होत्या. तिचे एक दिवसीय सामन्यातील करिअर अतिशय अल्प ठरले. त्यामध्ये तिने पाच बळी घेतले आणि १९८ धावा केल्या होत्या. गंमत म्हणजे मैदानी खेळातील सततच्या दुखापतींमुळे तिला टोकियो येथे झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचे प्रतिनिधित्व करता आले नाही. त्यामुळे तिने परत क्रिकेटकडे वळण्याचा निर्णय घेतला. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तिने टायटन्स टीमकडून खेळण्याचे ठरवले आणि जानेवारी २०२२ मध्ये पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर पदार्पण करताना १२३ चेंडू मध्ये १६० धावा फटकावल्या.
क्रिकेट आणि मैदानी स्पर्धेचा आणखी एक संबंध म्हणजे राय बेंजामिन या ऍथलेटने पुरुषांच्या ४०० मीटरच्या अडथळ्याच्या शर्यतीत ब्रांझ पदक जिंकले तो वेस्टइंडीजचे माजी वेगवान गोलंदाज विन्स्टन बेंजामिन यांचा मुलगा आहे. त्या पुढे जाऊन सांगण्याची गोष्ट म्हणजे ऑस्ट्रेलियाचा डावखुरा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कचा भाऊ ब्रँडन स्टार्क हा देखील जागतिक मैदानी स्पर्धा एकेकाळी खेळलेला आहे. पुरुषांच्या उंच उडी या प्रकारात तो आठव्या स्थानावर आला होता.





