Pune District : बोगदा आमच्या जखमेवर मीठ चोळणारा; आदिवासी शेतकऱ्यांचा तीव्र विरोध
Pune District :धरण प्रकल्पामुळे विस्थापनाचा फटका सहन केलेल्या कुटुंबांच्या समस्या अद्याप पूर्णपणे सुटलेल्या नसताना नवीन प्रकल्प लादण्याचा प्रयत्न अन्यायकारक असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

मंचर : आंबेगाव तालुक्यातील हुतात्मा बाबू गेनू सागर डिंभे धरण ते माणिकडोह धरणादरम्यान प्रस्तावित असलेल्या बोगद्याच्या सुरू होणाऱ्या कामाला आंबेगाव तालुक्यातील आदिवासी डोंगरी भागातील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे.
बोगद्याचे काम सुरू करून आमच्या जखमेवर मीठ चोळणारा’ निर्णय असल्याचा प्रतिक्रिया देवून धरणासाठी यापूर्वीच जमिनी गमावल्या, काही प्रमाणात कुटुंबांचे पुनर्वसनाचे प्रश्न अद्याप प्रलंबित आहेत. असे असताना बोगद्याची निविदा काढण्यासाठी शासनस्तरावर युद्धपातळीवर हालचाली सुरू असल्याचा आरोप आदिवासी बांधवांनी केला आहे.
धरण प्रकल्पामुळे विस्थापनाचा फटका सहन केलेल्या कुटुंबांच्या समस्या अद्याप पूर्णपणे सुटलेल्या नसताना नवीन प्रकल्प लादण्याचा प्रयत्न अन्यायकारक असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली. बोगद्यामुळे परिसरातील शेती, पाणी आणि पर्यावरणावर होणाऱ्या संभाव्य परिणामांबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली आहे.
बोगद्याला कोणत्याही परिस्थितीत परवानगी देणार नाही, अशी भूमिका आदिवासी शेतकऱ्यांनी घेतली असून, बोगदा रद्द करण्यासाठी शासनाने स्थानिक नागरिकांशी चर्चा करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. प्रकल्पाविरोधातील आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
धरणासाठी आमच्या जमिनी गेल्या, पुनर्वसनाचे प्रश्न काही प्रमाणात आजही कायम आहेत. आता बोगदा आदिवासी बांधवांवर अन्यायकारक लादला जात आहे. हा निणर्य म्हणजे आमच्या जखमेवर मीठ चोळणारा प्रकार आहे. कितीही दबाव आला तरी बोगदा होऊ देणार नाही.
-संजय गवारी,माजी सभापती, आंबेगाव तालुका पंचायत समिती.





