पिंपरी | कामगारांना भरुन द्यावी लागतेय मतदानाची पगारी सुट्टी

पिंपरी, (प्रतिनिधी) – मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकार्यांनी मतदानाच्या दिवशी कामगारांना पगारी सुट्टी देण्याचे आदेश दिले आहेत. मात्र मतदानाच्यादिवशी सुट्टी जाहीर करत अनेक खासगी कंपनी व्यवस्थापनाने या सुट्टीच्या बदल्यात एका दिवसाचे जादा काम करण्याच्या तोंडी सूचना दिल्या आहेत. त्यामुळे मतदानाची पगारी सुट्टी कामगारांना केवळ दाखविण्यापुरतीच मिळणार असल्याचे चित्र आहे.
दरवर्षी मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाच्या वतीने विविध उपक्रम राबविले जातात. यंदा उन्हाची वाढती तीव्रता आणि परीक्षांमुळे सुट्टीचा माहोल असल्याने या दुहेरी अडचणींवर मात करत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी कंबर कसली आहे. तर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी असलेले सुहास दिवसे यांनी जिल्ह्यातील सर्व खासगी कंपन्या, कारखाने व अन्य आस्थापनांना सुट्टी जाहीर करण्याचे निर्देश दिले आहेत. हे शक्य नसल्यास दोन तासांची सवलत देण्याचे सुचिवले आहे.
येत्या सोमवारी (दि.13) पुणे, शिरूर आणि मावळ लोकसभेकरिता मतदान होत आहे. जिल्हाभरातील पिंपरी, चिंचवड, भोसरी,लोणी देवकर (इंदापूर), आबी, उर्से, कुरकुंभ, चाकण, जेजुरी, टाकवे, बेबडओहळ, रांजणगाव व हिंजवडी येथे बर्याच औद्योगिक वसाहती आहेत. यामध्ये लाखो कामगार काम करत आहेत. येत्या 7 तारखेला होणार्या मतदानाच्यादिवशी कंपनी व्यवस्थापनाने या कामागारांना सुट्टी जाहीर केली आहे.
मात्र, त्याच्या बदल्यात पुढील आठवड्यातील याबाबत संताप व्यक्त करत एका कर्मचाऱ्याने सांगितले की, कंपनीने सुट्टीच्या दिवशी कामावर येण्याच्या सूचना केल्या आहेत. कंपनी उभारणीत मोलाचा वाटा असलेल्या कामगारांना एक दिवस पगारी सुट्टी देण्याची इच्छा कंपनी व्यवस्थापन दाखवत नाही.
याविरोधात कुठे दाद मागायची ?
कारवाईच्या भितीने जिल्हाधिकार्यांच्या निर्देशानुसार मतदानाच्या दिवशी कंपनी व्यवस्थापनाने कामगारांना पगारी सुट्टी जाहीर केली आहे. मात्र, त्याबदल्यात ही कसर भरुन देण्यासाठी एका सुट्टीच्यादिवशी कामावर येण्याची सक्ती केली आहे. याबाबत कोणतीही लेखी सूचना न करता केवळ तोंडी सूचना केल्या आहेत. त्यामुळे आता याविरोधात कुठे दाद मागायची असा प्रश्न कामगारांना पडला आहे.
काही कंपन्याचा वर्क फ्राॅम होम
काही काॅर्पोरेट कंपन्यांनी सोमवारी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी मतदानापूर्वी आणि नंतर वर्क फ्राॅर्म होम करण्याच्या तसेच आदल्या दिवशी असलेल्या रविवारी वर्क फ्राॅम होम करण्याच्या तोंडी सूचना दिल्याचे सांगण्यात आले आहे.





