Satara | खासगी कंपन्यांच्या बेकायदा वसुलीला रोखा

सातारा, (प्रतिनिधी) – खासगी फायनान्स कंपनीच्या त्रासामुळे एक महिला आत्महत्या करते. ते कुटूंब देशोधडीला लागते त्यावर पोलीस प्रशासन कारवाई करत नाही मात्र, अन्यायग्रस्तांच्या न्याय व हक्कासाठी लढणार्या कार्यकर्त्यांवर तातडीने गुन्हे दाखल करते ही बाब अत्यंत संतापजनक आहे.
अन्यायग्रस्त कर्जधारकांसाठी लढणार्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत, ज्या खासगी फायनान्स कंपन्या ग्राहकांची लूट करत आहेत त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष उमेश चव्हाण यांनी केली.
खाजगी फायनान्स कंपन्यांवर कारवाई व शिवसैनिकांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना निवेदन दिले. यावेळी उमेश चव्हाण, किरण माने, सतीश शिंदे, विनोद कवठेकर, ओमकर पवार, निलेश लोंढे, सौ. रीना पवार, सौ. विमल शिंदे, शंकर साठे, विजय पवार, सौ. गीता जगदाळे, सौ. सविता कणसे, भायज्या भोसले, सौ. अरुणा भोसले उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे, जिल्ह्यात असलेल्या खासगी फायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेतलेल्या कर्जधारकांचा छळ सुरु आहे.
कोरोना कालावधीनंतर मोठ उद्योग बुडाले. अनेक छोटे मोठे व्यावसायिक जगण्याची धडपड करत आहेत. बेरोजगारीचे प्रमाण वाढल्याने सर्वसामान्य माणसांचे जगणे असह्य झाले आहे.
त्यातच जीवनावश्यक वस्तू प्रचंड प्रमाणात महाग झाल्या असून महागाईच्या आगीत होरपळत सर्वसामान्य जनता जगत आहे.
खासगी फायनान्स कंपन्या पहिल्यांदा ग्राहकाच्या मागे लागतात आणि काही कारणास्तव हप्ते थकले की ज्या पध्दतीने या खासगी कंपन्या वसुली प्रक्रिया राबवत आहेत हा एक प्रकारे कायदेशीर छळच सुरु आहे. या फायनान्स कंपन्यांचे एजंट कर्जधारकांच्या घरात घुसतात. त्यांची भाषा अरेरावीच असते.
कर्जधारक मानसिक दबावाखाली व भीतीच्या छायेखाली जगत आहेत. एकीकडे जगण्याचा संघर्ष आणि दुसरीकडे एजंटांचा तगादा यातूनच काही दिवसांपूर्वी फायनान्स कंपनीच्या एजंटाच्या त्रासाला कंटाळून एक महिलेने आत्महत्या केली आहे.
ही बाब अत्यंत गंभीर असून या प्रश्नावरुन निवेदने देवूनही दखल न घेतल्याने शिवसेनेचे ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सचिन मोहिते व शिवसैनिकांनी संतप्त होवून एका खासगी कंपनीचे कार्यालय फोडले. यावरुन त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. पोलीस प्रशासनाच्या या भूमिकेचा आम्ही निषेध व्यक्त करतो.
अन्यथा रस्त्यावर उतरुन आंदोलन
ज्या खासगी फायनान्स कंपन्या ग्राहकांची लूट करत आहेत त्यांच्यावर कारवाई करावी. अनेक खासगी कंपन्या कर्जाचे महिलांना दाखवून बचतगटांची फसवणूक करुन फरार झाल्या आहेत.
शेअर मार्केटमधून गुंतवणुकीचे अमिष दाखवून हजारो सातारकरांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालून काही कंपन्या व ठग फरार आहेत.
त्यांच्यावर तक्रारी दाखल असून देखील पोलिसांकडून त्यावर कारवाई केली जात नाही ही निषेधार्ह बाब आहे. याची गांभीर्याने दखल घेवून आपण कार्यवाही अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरुन आंदोलन छेडावे लागेल.





