अमेरिकेचा भारतावर रशियन तेल आयातीवरून आरोप: खासगी कंपन्यांनी कमावला 16 अब्ज डॉलरचा अतिरिक्त नफा

वॉशिंग्टन – रशियाकडून खनिज तेल आयात केल्याबद्दल अमेरिकेने अतिरिक्त 25% सुरू लावण्याची घोषणा केली आहे. या निर्णयाचे अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसंट यांनी समर्थन केले आहे. ते म्हणाले की, भारताने केवळ स्वतःच्या उपयोगासाठी खनिज तेल आयात केलेले नाही तर भारतीय कंपन्यांनी रशियाकडून खनिज तेल आयात करून शुद्ध इंधनाची निर्यात करून आवश्यकतेपेक्षा जास्त नफा मिळविला आहे.
विशेषतः भारतातील खासगी कंपन्यांनी जास्त नफा मिळविला आहे. त्याचा फायदा फक्त भारतातील काही श्रीमंत कुटुंबांना झाला असल्याचा आरोप त्यांनी केला. भारताबरोबरच चीनही रशियाकडून खनिज तेल आयात करीत आहे. मात्र चीन विरोधात आयात शुल्क लावण्यात आलेले नाही.
या बाबीकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता बेसंट म्हणाले की, चीन अगोदरपासूनच रशियाकडून खनिज तेल आयात करीत होता. मात्र भारताने युद्ध सुरू झाल्यानंतर रशियाकडून खनिज तेल आयात वाढविली. भारताने देशांतर्गत वापराशिवाय या खनिज तेलापासून तयार झालेल्या इंधनाची युरोप आणि इतर देशांना निर्यात केली आहे. त्यातून जास्त नफा कमविला आहे असे त्यांनी सांगितले.
भारतातील खासगी कंपन्यांनी या व्यवहारातून आवश्यकतेपेक्षा 16 अब्ज जास्त नफा कमविला असल्याचा आरोपही त्यांनी केला. हा नफा खासगी कंपन्यांच्या श्रीमंत कुटुंबाकडे गेला असल्याचे त्यांनी म्हणाले. भारतातील सरकारी कंपन्यांनी फक्त देशातील वापराकरिता क्रुड आयात केले असे त्यांनी सांगितले.
विशेष म्हणजे जगातील खनिज तेलाच्या किमती जास्त वाढू नये यासाठी अमेरिकेच्या तत्कालीन प्रशासनानेच भारताने रशियाकडून तेल खरेदी करण्याची सूचना केली होती असे समजले जात होते. मात्र आता परिस्थिती बदलल्यानंतर अमेरिकेचे नवीन प्रशासन भारतावर टीका करीत आहे.





