PMPML WORKRES : ८ तासांपेक्षा जास्त काम, हातात ६५० रुपयेच; ओव्हरटाइमचे वेतन? कंत्राटी चालकांनी मांडली व्यथा; कामबंद आंदोलन, व्हिडीओ पाहा…

PMPML WORKRES : पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन मोठ्या शहरांना जोडणारी पीएमपीएमल सेवा प्रवाशांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असते. मात्र, पिंपरी चिंचवडमधील निगडी आगारातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी पगारात अपेक्षित वाढ न केल्याने शुक्रवारी काम बंद आंदोलन केलं. याचा फटका प्रवाशांना बसला आहे.
निगडी आगारातील इलेक्ट्रिक बसच्या कंत्राटी चालकांनी हे काम बंद आंदोलन केलं. कंत्राटी कर्मचारी आणि कंत्राटी चालक यांच्या वादामुळे हे आंदोलन करण्यात आलं. ८ तासांपेक्षा जास्त काम करूनही ओव्हरटाइम दिला जात नाही. दिवसाला ६५० रुपयेच मिळतात, असा आरोप या कंत्राटी चालकांनी केला आहे. यामुळे वेतनात वाढ व्हावी आणि इतर मागण्यांसाठी निगडी आगारातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलं.
नेमका वाद काय?
कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार कंत्राटी कर्मचाऱ्यांना ८ तास ड्युटीसाठी दर दिवशी ६५० रुपये दिले जातात. यात वाढ व्हावी आणि किमान वेतन ३० हजार द्यावे अशी मागणी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी केली आहे. पण कंत्राटदाराने आम्हाला पगार वाढणार नाही असं सांगितलं आहे. यामुळे एवढ्याशा पगारात आमचा खर्च भागत नाही, अशी व्यथा या कर्मचाऱ्यांची आहे. किमान वेतन ३० हजार द्यावे, अशी मागणी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी केली आहे.
PMPML Protest In Pimpri-Chinchwad pic.twitter.com/1nglInEcYi
— Maharashtra News (@MahaNews25) August 22, 2025
आंदोलकांची आक्रमक भूमिका
४९० इलेक्ट्रिक बस आहेत. यापैकी बहुतांश गाड्या या पीएमपीएल अंतर्गत कंत्राटी पद्धतीने चालवल्या जातात. पहिल्या शिफ्टमध्ये जवळपास ८० चालक काम करतात. त्यापैकी ७० पेक्षा जास्त चालक या आंदोलनात सहभागी झाले होते. गेल्या काही दिवसांपासून कंत्राटदार आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये वेतनावरून वाद सुरू आहे. जोपर्यंत पगार वाढवला केली जाणार नाही तोपर्यंत काम करणार नाही, अशी आक्रमक भूमिका या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.
ओव्हरटाइम दिला जात नाही
८ तास कामसाठी दिवसाला ६५० रुपये मिळतात, पण आठ तासांपेक्षा जास्त म्हणजेच किमान ९ ते १० तास काम चालक करतो. यामुळे उर्वरित तासांचा ओव्हरटाइम दिला जात नाही, त्यामुळे १००० रुपये दर दिवशी वेतन द्यावं, अशी मागणी करण्यात आली आहे.
हेही वाचा : Uday Samant : मंत्री उदय सामंत तडकाफडकी शरद पवारांच्या भेटीला, नेमकं कारण काय?





